‘ठरलं तर मग’ या मालिकेत सध्या प्रिया आणि अस्मिताने मिळून सायली विरुद्ध खोट्या गरोदरपणाचा कट रचल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. एकीकडे सायली गरोदर असल्यामुळे संपूर्ण सुभेदार कुटुंबीय आनंदात आहेत. परंतु, दुसरीकडे सायली-अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झाल्याने दोघेही लग्नाचं केवळ नाटक करत असतात त्यामुळे सायली गरोदर कशी काय राहू शकते? डॉक्टरांनी खोटे रिपोर्ट्स दिले असावेत असा अंदाज चैतन्य आणि अर्जुनला आला आहे. याशिवाय नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात हा कोणाचा तरी कट असू शकतो अशी शक्यताही अर्जुनने सायलीसमोर व्यक्त केली होती.
हेही वाचा : शाहरुख खानच्या ‘डंकी’ टीझरमध्ये दिसली प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची झलक, ‘त्या’ कॉमेडी सीनने वेधलं लक्ष
प्रिया व अस्मिता या दोघींनी मिळून सायलीला धडा शिकवण्यासाठी आणि सुभेदारांसमोर तिला खोट्यात पाडण्यासाठी ‘ठरलं तर मग’ मालिकेत सायलीच्या खोट्या गरोदरपणाचा कट रचला आहे. सायलीचे रिपोर्ट्स या दोघीही रुग्णालयातून बदलून घेतात. त्यामुळे डॉक्टर सायली गरोदर असल्याचं कल्पनाला फोन करून सांगतात. पण, प्रत्यक्षात सायली गरोदर नसतेच.
सायलीच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी सायली-अर्जुन पुन्हा डॉक्टरकडे जातात. यावेळी त्यांच्या मागोमाग प्रिया-अस्मिता सुद्धा तिकडे पोहोचतात. अर्जुनला अस्मितावर आधीच संशय असल्याने तो बहिणीकडे व्यवस्थित लक्ष ठेऊन असतो. प्रिया-अस्मिता खोट्या रिपोर्ट्सबद्दल बोलत असताना अर्जुन त्यांचं बोलणं गुपचूप ऐकतो. अस्मिता खोटे रिपोर्ट्स देणाऱ्या नर्सला शोधत असल्याचं अर्जुन पाहतो आणि त्याला घडल्या प्रकाराचा अंदाज येतो.
हेही वाचा : “त्या दोघी…”, सावत्र बहिणी इशा व अहाना देओलबरोबरच्या नात्याबद्दल सनी देओलने सोडलं मौन
रुग्णालयातून बाहेर आल्यावर अर्जुन संपूर्ण घटनाक्रम सायलीला समजावून सांगतो. यावर अस्मिता ताईंनी एवढं मोठं नाट्य रचलं असा प्रश्न सायली अर्जुनला विचारते. अर्जुन तिला म्हणतो, “फक्त अस्मिताचं नव्हे तर या कटात तन्वी (प्रिया)देखील सामील आहे.” नवऱ्याने केलेला खुलासा ऐकून सायली थक्क होते. आता सायली-अर्जुन सत्य समजल्यावर पुढे काय करतात? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
हेही वाचा : किंग खानच्या ‘Dunki’ चं ‘Donkey Routes’ शी नेमकं कनेक्शन काय? अवैध स्थलांतरावर बेतलाय चित्रपट
‘ठरलं तर मग’ चा महाएपिसोड येत्या ५ नोव्हेंबर प्रसारित करण्यात येणार आहे. या विशेष भागाच्या प्रोमोमध्ये सायली कल्पनाला ती गरोदर नसल्याचं सांगत असल्याचं पाहायला मिळत आहे. सायली गरोदर नाही ही गोष्ट कल्पनाला समजल्यावर ती सुनेबद्दल गैरसमज निर्माण करून घेणार की, लेक अस्मिताला अद्दल घडवणार? हे पाहणं गरजेचं ठरणार आहे.