‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या साक्षीने अर्जुन आणि चैतन्यवर फसवणुकीचे गंभीर आरोप केल्याचा सीक्वेन्स चालू आहे. साक्षी पत्रकार परिषद घेऊन अर्जुन आणि चैतन्यवर वात्सल्य आश्रमाप्रकरणी प्रेमाचं नाटक करून फसवणूक केल्याचे आरोप करते हे पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. अर्जुनच्या ऑफिसवर काहीजण हल्ला करतात आणि तुम्ही खोटे, फसवणूक करणारे वकील आहात असं बोलून भर ऑफिसमध्ये त्याला अपमानित करतात. हा प्रकार पाहून सायली आपल्या नवऱ्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहते. याशिवाय रविराज किल्लेदार देखील अर्जुनला पाठिंबा देतात.
रविराज घरी आल्यावर साक्षीने कसं अर्जुन आणि चैतन्यला फसवलंय याबद्दल प्रिया आणि नागराजला सांगत असतात. तसेच यापुढे मी अर्जुन-सायलीच्या पाठिशी राहून साक्षीला धडा शिकवणार असा निर्धार किल्लेदार करतात. रविराजची बदललेली भूमिका पाहून प्रियाला चिड येते. आता काही करून किल्लेदारसमोर अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फोडायचं असा निर्धार ती करते. तसेच आता लवकरच ती अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाइल शोधण्याची तयारी करणार आहे. “ती फाइल अर्जुनने पाताळात जरी लपवली असेल तरीही मी शोधून काढेन” असं प्रिया नागराजला सांगते. एकीकडे या गोष्टी सुरू असताना दुसरीकडे सुभेदारांच्या घरी वटपौर्णिमेची तयारी चालू असते.
हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सहायक दिग्दर्शकाचा अपघात, आठ दिवस कोमात; जुई गडकरी म्हणाली, “प्लीज गाड्या…”
अर्जुन मनातल्या मनात सात जन्म सायलीसारखी पत्नी मिळावी यासाठी उपवास करायचा असं ठरवतो. सायलीला पारंपरिक साडी नेसून नटून थटून आलेलं पाहून अर्जुन तिच्या नव्याने प्रेमात पडतो. परंतु, अद्याप दोघांनीही एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली नसते. कल्पना, अस्मिता आणि बायकोबरोबर अर्जुन देखील वडाची पूजा करायला जातो. वडाला फेरे घेताना अचानक पाऊस पडतो. यावेळी अर्जुन सायलीच्या डोक्यावर केळीचं पान धरतो. दोघांचं हे प्रेम पाहून कल्पना अतिशय आनंदी होते.
वडाला फेऱ्या मारताना दोघेही मनातल्या मनात आपल्याला सात जन्म हाच नवरा अन् हीच बायको मिळावी अशी प्रार्थना करतात. ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष भाग २० जूनला रात्री ८.३० वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. सगळेजण हा भाग पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आता तरी सायली – अर्जुन कॉन्ट्रॅक्ट मोडून एकत्र संसार करणार का? की त्याआधीच प्रियाच्या हाती त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाइल लागणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.