Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या मधुभाऊंच्या केसचा मुख्य साक्षीदार अथर्व विचारे चैतन्यच्या घरातून पळून गेल्याचा सीक्वेन्स चालू आहे. मात्र, येत्या भागात अर्जुन त्याला शोधून त्याची भेट घेत असल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
खूनाच्या रात्री अथर्व विचारेच्या म्हणजेच भावाच्या अंतिमविधीला गेले होते अशी खोटी माहिती साक्षी शिखरेने कोर्टात दिलेली असते. ती खोटं बोलतेय याचा अर्जुनला पुरेपूर अंदाज असतो. त्यामुळे अर्जुन या प्रकरणी पुढील तपास करण्याचा निर्णय घेतो. पोलिसांच्या मदतीने अर्जुन अथर्व विचारेची वैयक्तिक माहिती मिळवतो आणि काही करून आपल्याला या व्यक्तीला शोधायचंय असं सायलीला सांगतो.
महाशिवरात्रीनिमित्त सुभेदारांच्या घरी एका पूजेचं आयोजन केलेलं असतं. मधुभाऊंना वाचवण्यासाठी अथर्व विचारेला कसं शोधायचं याचा विचार सायली करत असते आणि एवढ्यात तिच्यासमोर अथर्व विचारे येऊन उभा राहतो. तो सुभेदारांच्या संस्थेत कर्मचारी म्हणून कार्यरत असतो. अथर्वला पाहताच सायली त्याला एका जागी बसवते आणि अर्जुनकडे जाते. अर्जुन अथर्वची भेट घेऊन त्याला संपूर्ण केसची माहिती देतो आणि चैतन्यकडे राहायला पाठवतो. पण, अचानक चैतन्यच्या घरून अथर्व विचारे पळ काढतो.
आता आगामी भागात अर्जुन अथर्व विचारेला शोधण्यात यशस्वी होणार असल्याचं पाहायला मिळेल. यानंतर खरी लढाई सुरू होणार आहे ती कोर्टात. अर्जुन पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजऱ्यात साक्षी शिखरेला उभं करणार आहे. अथर्व विचारेचा फोटो त्याने मोठ्या फ्रेममध्ये कोर्टात लावलेला असतो. अर्जुन साक्षीला विचारतो, “हा कोण आहे?”
साक्षी यावर म्हणते, “मी किती वेळा सांगू हा अथर्व विचारे माझा भाऊ आहे आणि खुनाच्या दिवशी मी त्याच्याच अंतिमविधीला गेले होते.” साक्षी पुन्हा खोटं बोलत असल्याचं ऐकून अर्जुन म्हणतो, “साक्षी शिखरे कोर्टाची फसवणूक करत आहेत. आणा रे त्याला…”
यानंतर कोर्टात चेहरा लपवून अथर्व विचारे एन्ट्री घेतोय असं पाहायला मिळतं. त्याला पाहून साक्षीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. ती प्रचंड अस्वस्थ होते, तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ती म्हणते, “हा इथे कसा?” यावर अर्जुन तिला विचारतो, “भूत बघितलं का?” हा जबरदस्त प्रोमो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. शनिवारी ८ मार्चला रात्री ८.१५ वाजता प्रेक्षकांना हा भाग पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अर्जुनला पुन्हा एकदा वकिलाच्या डॅशिंग अवतारात पाहून प्रेक्षक आनंदी झाले आहेत. मात्र, चेहरा झाकून अथर्वची एन्ट्री दाखवल्याने प्रेक्षक काहीसे संभ्रमात आहेत. मालिकेत ऐनवेळी वेगळा ट्विस्ट तर येणार नाही ना? अशा चर्चा कमेंट्समध्ये रंगल्या आहेत.