Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुनने पूर्णा आजीला प्रियाशी लग्न करण्याचं वचन दिल्याचा सीक्वेन्स चालू आहे. प्रियाशी लग्न करण्याची अर्जुनची अजिबातच इच्छा नसते. तो यासाठी नकार सुद्धा देतो मात्र, नातवाचा निर्णय ऐकून अचानक पूर्णा आजीची प्रकृती बिघडते. आजीला सगळेजण रुग्णालयात दाखल करतात. या ठिकाणीच पूर्णा आजी अर्जुनकडून ‘तन्वीशी लग्न कर’ असं वचन घेते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रिया एवढे दिवस खोटी तन्वी होऊन सुभेदारांच्या घरात वावरत असते. त्यामुळे तिची खरी ओळख महिपत, साक्षी शिखरे आणि नागराज वगळता आणखी कोणालाच माहिती नसते. सर्वांसमोर प्रिया…ती स्वत:च खरी तन्वी असल्याचं भासवत असते. तिच्या खोटेपणाला घरातले सगळेजण भुलतात आणि आता सुभेदार कुटुंबीयांनी मिळून प्रिया आणि अर्जुनचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्जुनने पूर्णा आजीला लग्नाचं वचन दिल्याचं सायली दाराआडून पाहते. ती भावुक होऊन तिथून निघून जाते. तर, अर्जुन सुद्धा बायकोच्या आठवणीत प्रचंड भावनिक झालेला असतो. यावेळी त्याचा मित्र चैतन्य त्याला धीर देतो. आता लवकरच प्रिया आणि सायली एकमेकींच्या आमनेसामने येणार आहेत. यावेळी सायली तिला चोख उत्तर देत तिची बोलती बंद करणार आहे. सायलीने काहीही झालं तरी, ‘मीच माझ्या नवऱ्याशी लग्न करणार’ असा निश्चय केलेला असतो. आता या तयारीला मिसेस सुभेदार लागलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मेहंदी सोहळ्याला सायलीची मदत करण्यासाठी आणि प्रियाला अद्दल घडवण्यासाठी मालिकेत खास पाहुणे येणार आहेत.

सुभेदार कुटुंबीयांनी मेहंदी सोहळ्याचं आयोजन केलेलं असतं. पण, आता प्रियाला सुगंधी मेहंदी न लागता शेणाची मेहंदी लागणार आहे. यासाठी ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अद्वैत चांदेकर आणि कला खरे मालिकेत आलेले आहेत.

कला म्हणते, “बरं सायली आपलं ठरलं होतं त्याप्रमाणे मी आणि चांदेकरने प्रियासाठी खास मेहंदीची व्यवस्था केलीये. शेण स्पेशल मेहंदी…त्या प्रियाला चांगली अद्दल घडवायला आणि तुझं-अर्जुनचं जमवायला हे कला आणि अद्वैत खमके आहेत” हे ऐकून सायलीला प्रचंड आनंद होतो. दोघीही एकमेकींशी हातमिळवणी करून ‘ठरलं तर मग’ म्हणतात आणि कामाला लागतात.

‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा ‘मेहंदी’ विशेष भाग मालिकेत १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. आता इथून पुढे मालिकेत काय ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharla tar mag adwait kala enters in the show to help sayali in mehendi ceremony watch promo sva 00