Tharla Tar Mag New Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या एकीकडे सुभेदारांच्या घरी अर्जुन आणि प्रियाची लग्नसराई सुरू असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. तर, दुसरीकडे सायली सुद्धा अर्जुनशी पुन्हा एकदा लग्न करण्याच्या तयारीत आहे. ऐनवेळी प्रियाची खोड मोडून सायली आपल्याच नवऱ्याशी पुन्हा एकदा लग्न करण्यास सज्ज झाली आहे. यासाठी तिला येत्या काळात कोण-कोण कशी मदत करणार आहे हे जाणून घेऊयात…
सायलीच्या मदतीसाठी सर्वात आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत अद्वैत आणि कला आले होते. या दोघांनी मिळून प्रियाच्या हातावर शेणाची मेहंदी लावण्याचा प्लॅन केला होता. यानंतर सायलीसाठी आणखी राया आणि मंजिरीने खास पंढरपुरातून हिरव्या बांगड्यांचा चुडा आणला होता. महासंगीत सोहळ्यात सायलीच्या पाठीशी नंदिनी ठामपणे उभी राहिल्याचं पाहायला मिळालं. आता येत्या काळात तिच्या मदतीसाठी आणखी दोन पाहुण्या मालिकेत प्रवेश करणार आहेत.
‘ठरलं तर मग’ मालिकेत ‘तू ही रे माझा मितवा’ फेम ईश्वरी आणि नम्रता येणार आहेत. या दोघींच्या हुशारीमुळेच सायलीला अर्जुनची उष्टी हळद लागणार आहे. ईश्वरी आणि नम्रता या दोघीही अचानक अर्जुन आणि प्रियाच्या हळदी सोहळ्यात जातात. त्या दोघीही अर्जुनला हळद लावतात. त्यानंतर, मोठ्या हुशारीने हळदीची भांडी बदलून सायलीसाठी अर्जुनची उष्टी हळद घेऊन जातात.
नवऱ्याची उष्टी हळद आल्याचं पाहून सायलीचा आनंद गगनाच मावेनासा होतो. १० फेब्रुवारीपासून हा सीक्वेन्स मालिकेत सुरू होणार आहे. याशिवाय आजपासून ( १० फेब्रुवारी ) वाहिनीवर एक मोठा बदल होणार आहे. ‘ठरलं तर मग’ मालिका आता ८:३० ऐवजी ८:१५ वाजता सुरू होईल. ही मालिका आता पाऊण तास प्रसारित केली जाणार आहे.
दरम्यान, प्रियाने कितीही प्रयत्न केले तरीही अखेरीस अर्जुनचं लग्न हे सायलीशीच होणार आहे. याबद्दल सांगताना मालिकेतील चैतन्य सांगतो, “प्रेक्षकांच्या मनात जे आहे तेच होईल. आता ते कधी होईल हे आम्ही आताच सांगू शकणार नाही. मालिकेत सायलीने असं ठरवलंय की, मी लग्न करणार माझ्या नवऱ्याशीच… त्यामुळे मालिकेत माझा हा पूर्ण प्रयत्न असेल की मी तिला हवी ती मदत करेन. यासाठी मी आणि कुसुम पूर्ण प्लॅनिंग करणार आहोत. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात जे आहे तेच घडेल.”