Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुनने आश्रम केससंदर्भात प्रियाला चौकशीसाठी नोटीस दिल्याचा सीक्वेन्स चालू आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रिया नवनवीन कारस्थानं रचून सुभेदार कुटुंबीयांना त्रास देत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे अर्जुन प्रियाला धडा शिकवण्यासाठी तिला नोटीस बजावतो.
अर्जुनने सगळ्या घरातल्यांसमोर अशाप्रकारे नोटीस बजावल्याने प्रिया पुन्हा एकदा तिची नाटकं सुरू करते. कल्पना, अश्विन आणि पूर्णा आजीसमोर प्रिया पुन्हा एकदा अर्जुन आणि सायलीला दोषी ठरवते. या सगळ्यात महिपतने अश्विनला जाणूनबुजून त्रास दिल्याने अर्जुन प्रचंड संतापतो. या सगळ्या गोष्टी तो दामिनीच्या कानावर घालतो. आता लवकरच आश्रम केसचा तपास करताना अर्जुनच्या हाती मोठा पुरावा लागणार आहे. या पुराव्याविषयी अर्जुन सायली आणि चैतन्यला सांगतो.
अर्जुन – विलासने पोलिसांना मेसेज केला होता की, मधुभाऊंपासून त्याच्या जीवाला धोका आहे. त्यानंतर मधुभाऊ आश्रमात पोहोचले, त्यांच्यात झटापट सुरू झाली. या सगळ्यात विलासला गोळी लागली. हे सगळं सुरू असताना जवळपास दीड ते दोन तास गेले असतील. त्यानंतर पोलीस आश्रमात आले.
सायली म्हणते – तो मेसेज वाचून पोलीस थोडे आधी आश्रमात पोहोचले हवे ना…
अर्जुन – हो पण, पोलीस नाही पोहोचले. मला वाटतं आपल्या हातात हुकूमाचा एक्का लागलाय मिसेस सायली.
आता अर्जुन हळुहळू केससंदर्भात नवनवीन पुरावे शोधून काढत असल्याचं पाहायला मिळत आहे. हे पुरावे कोर्टात सादर केल्यावर निश्चितच मधुभाऊंची बाजू भक्कम होईल. पण, या सगळ्यात महिपतच्या नव्या वकिल दामिनी काय खेळी खेळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मात्र, नेटकऱ्यांनी या प्रोमोवर नाराजी व्यक्त केली आहे. “बंद करा ही मालिका, सुरू झाल्यापासून एकच टॉपिक सुरू आहे”, “अर्जुनचा साबण खरंच स्लो आहे. एवढी सोपी गोष्ट त्याला आधी नाही का लक्षात आली? पैसे देऊन डिग्री घेतली आहे का?”, “प्रियाचं सत्य उघडकीस येणार पण नेहमीप्रमाणे प्रेक्षकांच्या हातात निराशाच येते इतक्या उत्सुकतेने एपिसोड्स बघावेत आणि दाखवत काहीच नाही फक्त प्रियाच जिंकताना दिसते कंटाळा आला आता”, “सगळे प्रोमो दिशाभूल करणारे असतात, खरंच कंटाळा आला आता” अशा प्रतिक्रिया युजर्सनी या प्रोमोच्या कमेंट्समध्ये दिल्या आहेत.

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष भाग बुधवारी ३० एप्रिलला रात्री ८:३० वाजता प्रसारित केला जाणार आहे.