Tharla Tar Mag Marathi Serial Updates : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या प्रियाने मधुभाऊंवर चोरीचा आळ घेतल्याचा सीक्वेन्स चालू आहे. प्रिया स्वत:च्या लग्नातील हार मुद्दाम मधुभाऊंच्या बॅगेत नेऊन लपवते आणि त्यानंतर संपूर्ण कुटुंबासमोर ड्रामा करून मधुभाऊंच्या खोलीची झडती घेते. यानंतर थोडं नाटक करून मधुभाऊंच्या बॅगेतून हार काढते आणि सर्वांसमोर त्यांना दोषी ठरवते. मात्र, अर्जुन पुढाकार घेऊन वेळीच सासऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहतो.
अर्जुन प्रियाला पोलिसांना चौकशी बोलूया अशी धमकी देतो यामुळे ती या प्रकरणातून काढता पाय घेते. याशिवाय अर्जुनचे वडील प्रताप सुद्धा या प्रकरणात प्रियावर आंधळेपणाने विश्वास न टाकता अर्जुनची बाजू घेतात. यामुळे प्रियाची बोलती बंद होते.
अश्विनशी लग्न होऊन सुभेदारांच्या घरात पाऊल टाकल्यापासून दिवसेंदिवस प्रिया नवनवीन कुरघोड्या करत असते. या सगळ्या गोष्टींवर निर्बंध घालण्यासाठी प्रियाची मोठी गळचेपी केली पाहिजे याची अर्जुनला जाणीव असते. म्हणूनच तो विलास खून प्रकरणाचा नव्याने तपास करून प्रियाने कोर्टात दिलेली साक्ष खरी आहे की खोटी याचा नव्याने तपास करतो.
प्रियाने कोर्टात दिलेल्या जबाबात प्रचंड विसंगती आढळल्याने अर्जुन तिला चौकशीसाठी नोटीस पाठवण्याचा निर्णय घेणार आहे. सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेले असताना अर्जुन प्रियासाठी खास गिफ्ट येऊन येतो. अर्जुन प्रियाला लग्नाचं गिफ्ट म्हणून विलास केसबद्दलच्या चौकशीची नोटीस देणार आहे. चौकशीचे कागदपत्र पाहून प्रियाची बोलती बंद होणार आहे.
प्रियाला देणार कायदेशीर नोटीस…
अर्जुन : तन्वी… अॅडव्होकेट अर्जुन सुभेदारकडून तुला वेडिंग गिफ्ट
कल्पना : काय आहे हे?
अर्जुन : तन्वीसाठी कायदेशीर नोटीस, विलासच्या खूनाच्या चौकशीसाठी… आता मधुभाऊ आणि तन्वीच्या स्टेटमेंटमधली तफावत शोधणार खरा गुन्हेगार… लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा ‘महाबुधवार’ विशेष भाग २३ एप्रिल रोजी रात्री ८:१५ वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रसारित होणार आहे. अर्जुनने प्रियाला नोटीस बजावल्याने नेटकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. लवकरात लवकरत प्रियाचा खोटेपणा सिद्ध करून तिला सुभेदारांच्या घरातून बाहेर काढा अशा कमेंट्स या प्रोमोवर आल्या आहेत.