Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून सुभेदार कुटुंबीयांनी अर्जुन-प्रियाच्या लग्नाची तयारी सुरू केल्याचा सीक्वेन्स चालू आहे. प्रिया या मालिकेची खलनायिका असल्याने प्रेक्षकांच्या मनात अर्जुनचं लग्न नेमकं कोणाशी होणारी याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. याबाबत ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य ( अर्जुनचा मित्र ) आणि अश्विन ( अर्जुनचा भाऊ ) यांनी स्टार मीडियाला मराठीला मुलाखत दिली आहे. यामध्ये या दोघांनी मालिकेच्या आगामी भागात काय घडणार याबद्दल खुलासा केला आहे.
अश्विनची भूमिका मालिकेत प्रतिक सुरेश तर, चैतन्यची भूमिका या मालिकेत अभिनेता चैतन्य सरदेशपांडे साकारत आहे. या दोघांनी मुलाखतीत मालिकेच्या आगामी ट्रॅकविषयी खुलासा केला आहे. सध्या मालिकेत अर्जुन-प्रियाच्या मेहंदी सोहळ्याचा सीक्वेन्स चालू आहे. तर, दुसरीकडे सायलीने आपल्याच नवऱ्याशी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
चैतन्यची अर्जुनचं लग्न सायलीबरोबर व्हावं अशी इच्छा आहे. तर, अश्विनची इच्छा सध्याच्या घडीला अर्जुनचं लग्न प्रियाबरोबर व्हावं अशी आहे. याबद्दल सांगताना चैतन्य म्हणाला, “प्रेक्षकांच्या मनात जे आहे तेच होईल. आता ते कधी होईल हे आम्ही आताच सांगू शकणार नाही. मालिकेत सायलीने असं ठरवलंय की, मी लग्न करणार माझ्या नवऱ्याशीच… त्यामुळे मालिकेत माझा हा पूर्ण प्रयत्न असेल की मी तिला हवी ती मदत करेन. यासाठी मी आणि कुसुम पूर्ण प्लॅनिंग करणार आहोत. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात जे आहे तेच घडेल.”
याशिवाय सायलीची भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीने सुद्धा अर्जुन आणि सायलीचं लग्न होणार असं माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे. चैतन्यला तिने, ‘सुभेदारांच्या घरातील सगळ्या हालचाली मला कळव’ असं सांगितलं आहे.
आता अर्जुन आणि सायलीचं लग्न नेमकं कसं आणि कधी होणार यासाठी तुम्हाला आगामी भाग पाहावे लागतील असंही चैतन्यने सांगितलं. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, प्रियासा खोलीत बंद करून अर्जुन आणि सायलीला लग्नासाठी प्रतिमा मदत करेल अशी दाट शक्यता आहे. आता सुभेदारांच्या घरचा हा लग्नसोहळा कसा पार पडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक ( Tharla Tar Mag ) सुद्धा आतुर झाले आहेत.