‘ठरलं तर मग’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली सायली म्हणजेच जुई गडकरी सध्या चर्चेत आहे. जुईने याआधी ‘पुढचं पाऊल’, ‘सरस्वती’, ‘वर्तुळ’ अशा अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या जुई स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारतेय. गेल्या दीड वर्षापासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय तसंच टीआरपीमध्ये या मालिकेने आपलं अव्वल स्थान राखून ठेवलंय.

वेगवेगळ्या भूमिका साकारत आपल्या अभिनयाने जसं जुईने सगळ्यांचं मन जिंकलंय तसंच या इंडस्ट्रीत आल्यापासून जुई अनेक समस्यांनादेखील सामोरी गेली आहे. मनोरंजनसृष्टी जितकी लोकांना ग्लॅमरस वाटते तितकंच काही ना काही कडू सत्य या इंडस्ट्रीमध्ये असतंच. या इंडस्ट्रीत आल्यावर प्रत्येक कलाकाराचे चांगले- वाईट अनुभव असतात. असाच एक वाईट अनुभव जुई गडकरीच्या आयुष्यात अनावधानाने आला. याबद्दल अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

हेही वाचा… “गर्भाशय नाही तर…”, दीपिका पदुकोणला ट्रोल करणाऱ्यांना रिचा चड्ढा स्पष्टच म्हणाली…

जुईने नुकतीच कॉकटेल स्टुडिओला मुलाखत दिली. यावेळी जुईने एका मालिकेमध्ये मिळालेल्या वाईट वागणुकीबद्दल सांगितलं. एका सीनसाठी जुईला चार ते पाचवेळा कानशिलात लगावण्यात आली होती. याबद्दलचा किस्सा सांगत जुई म्हणाली, “आज खूप मोठी लेखिका आहे ती व्यक्ती जिच्याबरोबर मी २००९-१० साली मी एका मालिकेमध्ये काम करत होतं. त्यावेळेस मला कानाखाली मारायचा सीक्वेन्स होता. तेव्हा दिग्दर्शक अॅक्शन बोलायच्या आत मला कानाखाली पडली होती.आणि मी थोडी नाजूक आहे. ज्या व्यक्तीने मला मारलं होतं ती सहा फूटांची होती आणि खूप धष्टपुष्ट व्यक्ती होती. मला जोरात कानाखाली पडल्यानंतर २ सेकंद माझ्या कानातून आवाज यायला लागला. मला कळलंच नाही की काय झालं. त्या सीननंतर मी प्रतिक्रियाच दिली नाही आणि म्हणून तो शॉट कट झाला.”

जुई पुढे म्हणाली, “त्यानंतर दुसरा टेक झाला. अॅक्शन बोलल्यावर परत मला कानाखाली पडली होती आणि मला असं झालं की माझ्याबरोबर हे काय होतंय. मला कळतंच नव्हतं. त्यावेळेस सेटवर असलेला थर्माकॉल हातात धरलेला एक माणूस हसायला लागला. मला आजूबाजूला हसणार्यांचे आवाज यायला लागले. तिसरा टेक, चौथा टेक आणि मला पाच-सहा वेळा कानाखाली मारलं. आणि त्यानंतर मला खरोखर रडू यायला लागलं. त्या टेकमध्ये मी हात गालावरच ठेवून होते. मी पुढचे डायलॉग्सदेखील बोलू शकत नव्हते. मी पुढचा सीनच विसरले.”

हेही वाचा… “ए काळी आली काळी आली…”, जुई गडकरीला लोक रंगावरून हिणवायचे, अभिनेत्री वाईट अनुभव सांगत म्हणाली, “मी खूप रडायचे…”

“माझ्याबरोबर नक्की काय घडलंय हे मला कळलंच नव्हत. नंतर काही दिवसांनी मला कळलं की हे शॉट आपण चीट करू शकतो. म्हणजे मी इतकी साधी होते की मला हे माहितच नव्हतं की असे शॉट चीट करून शूट केले जातात. मला वाटत होतं की खरोखर कानाखाली मारतात.” असंही जुई म्हणाली.

“जेव्हा माझ्याबरोबर हे सगळं घडलं तेव्हा मला वाटलं की, ज्या व्यक्तीने मला कानाखाली मारलं होतं तिला मला मारून नक्की काय मिळालं. एवढ्या मोठ्या युनिटच्या समोर माझी अशी चेष्टा करून त्या व्यक्तीला काय मिळालं. त्यामुळे आज मला त्या व्यक्तीबद्दल अजिबात आदर नाही आहे. मला असं वाटतं की इंडस्ट्रीत नवीन येणार्या व्यक्तीला तुम्ही कशाप्रकारे वागवता यावरून तुमची स्वताची पात्रता कळते. नवीन येणार्यांना आपण सांगू शकतो की तुम्ही असं वागा, तसं वागा. तुम्ही त्यांना असं अपमानित नाही करू शकत आणि करूही नये, कारण तिच पिढी पुढे जाऊन सिनिअर्स होतात. म्हणून आता सिनिअर म्हणून मला असं वाटतं की चांगल्या गोष्टी इंडस्ट्रीत नवीन येणार्या व्यक्तींसमोर आणाव्यात.”