अभिनेत्री जुई गडकरी सध्या तिच्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे. या छोट्या पडद्यावरील मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत जुई गडकरीने ‘सायली’ हे प्रमुख पात्र साकारले आहे. अलीकडेच अभिनेत्रीचा मालिकेतील सहकलाकारांबरोबर वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ती मालिकेतील मैत्रिणींसह कर्जत येथे फिरायला गेली होती. दैनंदिन शूटिंग, सेटवरची धमाल या व्यतिरिक्त जुईने स्वत:च्या आयुष्यात काही नियम बनवून घेतले आहेत. हे नियम काय आहेत? याबद्दल जुईने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
जुई गडकरीला ‘अल्ट्रा मराठी’च्या मुलाखतीत पावसाळ्यात तू स्वत:ची काळजी घेण्यासाठी काही विशिष्ट नियम बनवतेस का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, “पावसात असे नाही…मी १२ महिने नियमांमध्ये जगणारी मुलगी आहे. माझे दैनंदिन आयुष्य जगताना मी स्वत:साठी अनेक नियम बनवून ठेवले आहेत. त्याचे मी पालन सुद्धा करते.”
जुई पुढे म्हणाली, “पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी मी डाएट प्लॅन फॉलो करते. गाडीमधून येता-जाता सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे, कुठेही पोहोचण्यासाठी कितीही उशीर झाला तरी मी स्पीडमध्ये गाडी चालवत नाही. पावसात विशेषत: बाईकवरून प्रवास करणे जास्त धोकायदायक असते त्यामुळे सगळाच विचार करून मी सावकाश गाडी चालवण्यास प्राधान्य देते.” असे अनेक नियम आहेत.
हेही वाचा : “आज बिल्डिंगमध्ये फरसाण वाटते…”, सई ताम्हणकरने वाढदिवसानिमित्त प्राजक्ता माळीला दिल्या हटके शुभेच्छा
दरम्यान, जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या‘ठरलं तर मग’ या मालिकेला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा पहिल्या क्रमांकावर आहे.