Tharla Tar Mag Fame Monika Dabade : ‘ठरलं तर मग’ मालिकेत अस्मिता म्हणजेच अर्जुनच्या बहिणीची भूमिका अभिनेत्री मोनिका दबाडे साकारत आहे. महिन्याभरापूर्वीच मोनिकाच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं. मोनिकाने गोंडस अशा मुलीला १५ मार्च २०२५ रोजी जन्म दिला. आज अभिनेत्रीला आई होऊन एक महिना पूर्ण झाला आहे, यानिमित्ताने तिने खास पोस्ट शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री मोनिका दबाडेचं डोहाळेजेवण थाटामाटात पार पडलं होतं. यानंतर अभिनेत्रीला मुलगा होणार की मुलगी याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर गेल्या महिन्यात मोनिकाने तिला मुलगी झाल्याची आनंदाची बातमी सर्वांना दिली.

आता चिमुकल्या लेकीला १ महिना पूर्ण झाल्यावर मोनिकाने खास पोस्ट शेअर करत आई झाल्यानंतरचा तिचा अनुभव सांगितला आहे.

मोनिकाची पोस्ट…

आमचा १ महिना …
बाळाला आणि मला आई होऊन तब्बल १ महिना झाला पण…

C-section मुळे पोटात आणि पाठीत होत असलेल्या वेदना…
अपुरी झोप…
कोणाचीही मदत न घेता स्वतः सगळं करण्याचा माझा अट्टाहास…
आवडतं काम करता न येण्यामुळे होणारी रडरड…
हवं ते न खाता येण्यामुळे जेवणाची इच्छा जाणे …
आणि बरंच काही होत असताना…
फक्त
एक चेहरा आपल्याला हे सगळं विसरण्याची भुरळ घालू शकतो…
यावर कधीही विश्वास नसलेली मी…
आणि माझी गोंडुबाई…

मोनिकाचा पती चिन्मय कुलकर्णीची लेकीसाठी खास कविता

एक महिन्याचा बाप

बाप कसं व्हायचं माहीत नसतं..
बाप होण्याच्या प्रयत्नात थोडं जमतं,
बरचसं फसतं..
बाप कसं व्हायचं
हे शिकावं आपल्या बापाला स्मरून
नाहीच जमलं तर शिकवेल लेकरू
अक्षरशः तुमचं बोट धरून

दरम्यान, मोनिका लेकीच्या जन्मानंतर एकटी सगळ्या गोष्टी जबाबदारीने करत असल्याने सर्वजण तिचं कौतुक करत आहेत. सध्या संपूर्ण मनोरंजन विश्वातून मोनिका व चिन्मय यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. मोनिकाचा पती चिन्मय कुलकर्णी हा रिॲलिटी शोजचा लेखक म्हणून काम करतो.