Tharla Tar Mag Fame Asmita Aka Monika Dabade : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन-सायलीचं पुन्हा एकदा लग्न झाल्याचा सीक्वेन्स चालू आहे. ही मालिका गेली दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. सुभेदारांच्या घरातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मालिकेत अर्जुनच्या बहिणीची म्हणजेच अस्मिताची भूमिका अभिनेत्री मोनिका दबाडे साकारत आहे.
मोनिका वैयक्तिक आयुष्यात लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच सेटवर तिचं डोहाळेजेवण साजरं करण्यात आलं होतं. आता मोनिकाला आठवा महिना सुरू आहे. अभिनेत्री आता लवकरच आई होणार असल्याने ती मालिकेतून काही दिवस ब्रेक घेणार आहे. याबद्दल मोनिकाने स्वत: ‘स्टार मीडिया मराठी’ या युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना खुलासा केला आहे.
मोनिका म्हणते, “ठरलं तर मग’ मालिकेमुळे लोकांचं मला भरभरून प्रेम मिळालं. सेटवर माझ्या सगळ्या मैत्रिणींनी मिळून माझं डोहाळेजेवण केलं होतं. तो क्षण माझ्यासाठी खूपच खास होता. आमचं सर्वांचं एकमेकांशी तेवढंच छान बॉण्डिंग आहे. आज मी कॅमेऱ्यासमोर सांगतेय की, मी मालिका सोडणार नाहीये. फक्त १-२ महिन्यांचा मोठा ब्रेक घेऊन मी पुन्हा येणार आहे. या भूमिकेत तुम्ही माझ्याशिवाय इतर कोणालाही पाहणार नाही ही माझी गॅरंटी आहे. कारण, दोन वर्षे ही भूमिका मी जगवलीये. आता अंतिम निर्णय चॅनेलचा आहे. पण, मला या मालिकेत पुन्हा येऊन काम करायचंय. फेब्रुवारीचं शूट पूर्ण करून मी मार्चमध्ये ब्रेक घेणार आहे. त्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्याच्या दरम्यान मी पुन्हा येईन. पावसाळ्याच्या आत मी सेटवर परतेन.”
“मला खूप मेसेज येतात, कमेंट्स येतात की आम्हाला अस्मिता म्हणून इतर कोणालाही पाहायचं नाहीये. हीच माझ्या कामाची पोचपावती आहे. त्यामुळे मी नक्की येईन.” असं मोनिकाने यावेळी सांगितलं.

दरम्यान, मोनिका साकारत असलेल्या पात्राबाबत सांगायचं झालं तर, ‘ठरलं तर मग’ मालिकेत ती अस्मिता हे नकारात्मक पात्र साकारत आहे. अस्मिता ही अर्जुनची सख्खी बहीण असते. सायली विरोधात ती कायम काही ना काही कुरापती करत असते. ही भूमिका नकारात्मक आहे. तरीही अस्मिताशिवाय सुभेदारांचं घर नेहमीच अपूर्ण वाटतं.