Tharla Tar Mag Fame Actors Dance Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेत काम करणाऱ्या सगळ्या कलाकारांचा ऑफस्क्रीन एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. या मालिकेत अर्जुनच्या जवळच्या मित्राची म्हणजेच चैतन्यची भूमिका अभिनेता चैतन्य सरदेशपांडे साकारत आहे. तर, सायलीच्या मैत्रिणीच्या म्हणजेच कुसुमच्या भूमिकेत अभिनेत्री दिशा दानडे झळकत आहे. सध्या मालिकेत सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटून या दोघांमध्ये कुटुंबीयांमुळे दुरावा आल्याचा सीक्वेन्स चालू आहे. पण, सायली-अर्जुनमधली ही कौटुंबिक दरी कमी करण्यासाठी कुसुम आणि चैतन्य मालिकेत नेहमीच भन्नाट कल्पना शोधत असतात.
कुसुम आणि चैतन्य यांची ऑफस्क्रीन एकमेकांशी चांगली मैत्री आहे. यापूर्वी हे दोघं एका तामिळ गाण्यावर थिरकले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता या पाठोपाठ चैतन्य आणि दिशा यांनी आणखी एका सुपरहिट बॉलीवूड गाण्यावर डान्स केला आहे.
शाहरुख खान आणि काजोल यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘कुछ कुछ होता हैं’ हा चित्रपट १९९८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला या वर्षात तब्बल २७ वर्षे पूर्ण होणार आहेत. शाहरुखच्या चित्रपटातील बहुतांश सगळीच गाणी सुपरहिट ठरली. राहुल, टिना आणि अंजली कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण करत असताना एकत्र ‘मुझको क्या हुआ है?… कोई मिल गया’ या गाण्यावर थिरकले होते.
याच बॉलीवूड गाण्यावर चैतन्य आणि दिशा यांनी कमाल एक्स्प्रेशन्स देत जबरदस्त डान्स केला आहे. या दोघांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामुळेच या व्हिडीओला अवघ्या दोन दिवसांत १३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये कुसुम साडी नेसून तर, चैतन्य ट्रेडिशनल लूक करुन बॉलीवूड गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, चैतन्य आणि दिशा यांच्या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “खूप छान… तुम्ही दोघं पण खूप छान आहात”, “लव्हली”, “डान्स करताना मधुभाऊंना पण घ्या…”, “अप्रतिम मस्तच भारी”, “Nice कुसुम ताई आणि चैतन्य दादा” अशा असंख्य प्रतिक्रिया लिहित नेटरऱ्यांनी या व्हिडीओवर लाइक्स अन् कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.