स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेने कमी वेळातच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. एवढच नव्हे तर आतापर्यंत या मालिकेने टीआरपीचं अव्वल स्थान राखून ठेवलं आहे. मालिकेप्रमाणेच या मालिकेतील पात्रांवरदेखील प्रेक्षक तेवढ्याच आपुलकीने प्रेम करतात. मालिकेत सायलीची प्रमुख भूमिका साकारणारी जुई गडकरीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय.
जुई सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. मालिकेच्या सेटवरील BTS (Behind The Scenes), व्हिडीओ अनेकदा ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. आता अभिनेत्रीने एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सायली या भूमिकेसाठी जुई नक्की कशी तयार होते हे तिने दाखवलंय.
या व्हिडीओत सायली मिरर व्हिडीओ काढतेय असं दिसतंय. यात सायलीने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे आणि दोन हेयर आर्टिस्ट तिची हेयरस्टाईल करत आहेत. “तयार होतेय” असं कॅप्शन जुईने या व्हिडीओला दिलंय. मिनिमल मेकअप, झुमके, हिरव्या बांगड्या, मंगळसूत्र असा सायलीचा या मालिकेसाठी लूक असतो.
सध्या मालिकेत काय घडतंय
‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचलीय. चैतन्य आणि अर्जुन एकत्र आहेत आणि त्यांनीच तिच्या नकळत तिच्याविरोधात पुरावे गोळा करून कोर्टात सादर केलेत हे साक्षीला कळतं, त्यामुळे ती पत्रकार परिषद बोलावून घेते आणि “अर्जुन आणि चैतन्यने मला फसवलंय” असं जाहीर करते. यानंतर काही माणसांना पाठवून ती अर्जुनच्या ऑफिसवर हल्ला करवून घेते. यामुळे अर्जुन-सायली आणि चैतन्य तिघंही अडचणीत येतात.
आता हा डाव अर्जुन-सायली साक्षीवर कसा उलवटणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतायत. आता साक्षी सावध झाल्याने तिच्या विरोधात पुरावे गोळा करणं अजून कठीण होऊन जाईल, अशा परिस्थितीत अर्जुन साक्षीविरोधात पुरावे गोळा करून मधुभाऊंची सुटका करू शकेल का हे येत्या भागांमध्ये स्पष्ट होईल.
हेही वाचा… ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीच्या लेकाने ‘असं’ दिलं बाबाला सरप्राईज, अभिनेता फोटो शेअर करत म्हणाला…
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ या मालिकेत जुई गडकरी आणि अमित भानुशाली अर्जुन सुभेदार आणि सायली या प्रमुख भूमिका साकारत आहेत, तर प्रियांका तेंडोलकर, ज्योती चांदेकर, प्राजक्ता दिघे, चैतन्य सरदेशपांडे, केतकी पालव या कलाकारांच्यादेखील यात निर्णायक भूमिका आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd