Tharla Tar Mag Fame Sayali : ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५’ हा सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात ‘ठरलं तर मग’ला ‘सर्वोत्कृष्ट महामालिका प्रेक्षक पसंती’ हा पुरस्कार मिळाला. ही मालिका गेल्या दोन वर्षांपासून छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवत आहे. ‘ठरलं तर मग’ मालिका यंदा सर्वोत्कृष्ट ठरली असली, तरीही या मालिकेतील मुख्य जोडीला या सोहळ्यात एकही पुरस्कार मिळाला नव्हता.

‘स्टार प्रवाह’चा पुरस्कार सोहळा पार पडल्यावर ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या चाहत्यांनी याबद्दल कमेंट्स सेक्शनमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली होती. टीआरपी टॉपर असलेल्या मालिकेतील मुख्य कलाकार एक तरी अवॉर्ड डिझर्व्ह करत होते अशा कमेंट्स ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्रामवर नेटकऱ्यांनी केल्या होत्या.

मात्र, मुख्य सोहळ्यात एकही पुरस्कार मिळाला नसला, तरी सायलीची भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीला एक खास पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार कोणी दिलाय? जाणून पाहुयात…

सायलीसाठी तिच्या चाहत्यांनी खास ट्रॉफी डिझाईन केलीये. हा पुरस्कार घेऊन अभिनेत्रीचे चाहते थेट ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर पोहोचले होते. या ट्रॉफीवर ‘जुई गडकरी- लाडकी लेक ( क्वीन ऑफ हार्ट्स )’ असं लिहिण्यात आलं आहे. याचा फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

जुई गडकरी पोस्ट शेअर करत लिहिते, “प्रत्येक ट्रॉफी ही लाखमोलाची असते पण, ही जरा जास्तच खास आहे कारण, ही ट्रॉफी माझ्या कायम हृदयाजवळ राहणार आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या चाहत्यांचे व हितचिंतकांचे खूप खूप आभार. तुम्ही सेटवर येऊन आमची प्रशंसा केली, ट्रॉफी दिली, आमच्यासाठी गिफ्ट्स आणि गोड पदार्थ आणले… मी खरंच तुमची कृतज्ञ आहे. मुलींनो तुमचे खूप खूप आभार…तुम्ही मला ‘क्वीन ऑफ हार्ट्स’ म्हटलं याचा अभिमान आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी ‘क्वीन ऑफ हार्ट्स’ असेन तर, तुम्ही सगळ्या ‘हॉर्ट ऑफ गोल्ड’ आहात.”

‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीची पोस्ट ( Tharla Tar Mag )

दरम्यान, जुई गडकरीने तिच्या चाहत्यांना या पोस्टमध्ये टॅग देखील केलं आहे. चाहत्यांनी दिलेला पुरस्कार, चॉकलेट्स या सगळ्याचे फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.