Tharla Tar Mag Fame Actors : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या मधुभाऊंनी दिलेल्या वचनामुळे सायली-अर्जुनमध्ये दुरावा आल्याचा सीक्वेन्स चालू आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सर्वांसमोर उघड झाल्यापासून मधुभाऊंनी, “अर्जुनची कोणताही संपर्क ठेवणार नाही” असं सायलीकडून वचन घेतलेलं असतं. याशिवाय ते लेकीची रवानगी कोल्हापूरला करतात. पण, कुसुम या दोघांना एकत्र आणण्यासाठी कोल्हापूरच्या बसमधून सायलीसह उतरून पुन्हा माघारी येते. ऑनस्क्रीन मधुभाऊ सायलीवर नाराज असले तरी, खऱ्या आयुष्यात परिस्थिती खूपच वेगळी आहे.
सायली, कुसुम आणि मधुभाऊंनी नुकताच ऑफस्क्रीन ‘बम्बई से गयी पूना’ या ३२ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर डान्स केला आहे. हे गाणं १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम हैं राही प्यार के’ चित्रपटातलं आहे. तर, या सिनेमात जुही चावला आणि आमिर खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. “बम्बई से गयी पूना, पूना से गयी दिल्ली, दिल्ली से गयी पटना फिर भी ना मिला सजना” असे या गाण्याचे बोल आहेत.
सायली, कुसुम व मधुभाऊंच्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
‘बम्बई से गयी पूना’ या गाण्याच्या ओळी आणि ‘ठरलं तर मग’ मालिकेचा सध्याचा ट्रॅक या गोष्टी प्रेक्षकांना समर्पक वाटत आहेत. यामुळेच या तिघांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. कुसुमची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा कमेंट करत म्हणते, “तुम्ही ‘कडूभाऊ’ म्हणत असाल सध्या यांना… पण आमचे नारायण मामा हे गोडच आहेत.”
तर, काही नेटकऱ्यांनी “२०२५ मैं मिलेगा सजना खूप भारी”, “अरे तो सजना तिकडे रडत आहे.”, “तुझ्यामागे मधुभाऊ असेपर्यंत नाही मिळणार सजना…”, “पनवेल से कुर्ला, कुर्ला से कोल्हापूर व्हाया पूना…”, “कोल्हापूरला तर गेली नाहीस परत आलीस” अशा मजेशीर कमेंट्स या व्हिडीओवर केल्या आहेत.
सायली, कुसुम आणि मधुभाऊ हे तिघेही या गाण्यावर हटके अंदाजात थिरकले आहेत. सायली हा व्हिडीओ शेअर करत लिहिते, “आमचं २०२४ हे वर्ष सुद्धा असंच काहीसं गेलं…हम है राही प्यार के! नारायण मामा म्हणजेच मधुभाऊंनी या गाण्यावर डान्स करताना साथ दिली, ही गोष्ट आमच्यासाठी आनंददायी होती. २०२४ या वर्षात मला अनेक गोष्टी मिळाल्या. लवकरच याबद्दल तुम्हाला सांगेन…एकंदर वर्ष सुंदर गेलं. नव्या वर्षासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!”
दरम्यान, आता ‘ठरलं तर मग’ ( Tharla Tar Mag ) मालिकेत सायलीला तिचा सजना केव्हा भेटणार याची प्रेक्षकांच्या मनात देखील उत्सुकता निर्माण झालेली आहे.