‘स्टार प्रवाह’ची ‘ठरलं तर मग’ मालिका सध्या अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. साक्षी आणि महिपतची कारस्थानं उघड करण्याचा अर्जुन सर्वतोपरी प्रयत्न करतोय. मात्र, अर्जुनचा न्याय मिळवण्यासाठीचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. अर्जुनच्या वाटेत आता महिपत आणखी एक अडसर आणणार आहे. साक्षीच्या बाजूने केस लढवण्यासाठी महिपतने हुकमी एक्का शोधून काढला आहे. हा हुकमी एक्का म्हणजे नामांकित वकील दामिनी देशमुख. मालिकेच्या पुढील भागांमध्ये अर्जुन विरुद्ध दामिनी हा सामना कथानकाची उत्कंठा आणखी वाढवणार आहे.

सुप्रसिद्ध अभिनेत्री क्षिती जोग या मालिकेत दामिनी देशमुख ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. या भूमिकेविषयी सांगताना क्षिती म्हणाली, ‘ठरलं तर मग संपूर्ण महाराष्ट्राची आवडती मालिका आहे. या मालिकेचा एक भाग होताना अत्यंत आनंद होतोय. दामिनी देशमुख या वकीलाची भूमिका मी साकारणार आहे. दामिनी देशमुख दुसऱ्यांना हरवण्यासाठी नाही तर स्वत: जिंकण्यासाठी केस लढते. साक्षीची केस यापुढे ती लढणार आहे. त्यामुळे हे पात्र साकारण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे अशी भावना क्षिती जोग यांनी व्यक्त केली.”

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत क्षिती जोग म्हणाली, “सुचित्राचं हे प्रोडक्शन आहे इथूनच खरी सुरुवात झाली. मला त्यांचा फोन आला होता, सोहमने सुद्धा फोन केला होता. ही भूमिका अशी-अशी आहे तर तू करशील का? असं त्यांनी मला विचारलं. ही भूमिका सकारात्मक नाहीये, वाईट नाहीये… अशी मधली आहे कारण, दामिनीचा स्वभाव रोखठोक आहे. एकंदर मलाही सूट होईल असा हा रोल आहे… शिवाय या मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले आहेत. त्यांच्याबरोबर मी याआधी काम केलेलं आहे. सगळी टीम खूप छान आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, शो नंबर वन आहे त्यामुळे अशी भूमिका करायला कोणाला नाही आवडणार मी लगेच होकार दिला.”

“माझी आई ( उज्वला जोग ) सुद्धा ही मालिका रोज पाहते. त्यामुळे मालिकेत काय सुरूये हे मला आधीच माहिती होतं. याशिवाय प्रोमो पाहिल्यावर मला माझ्या मावशीनेही मेसेज करून, ‘तू अर्जुनच्या विरुद्ध केस वगैरे नको लढूस’ असं सांगितलं होतं. यावरून शोची लोकप्रियता लक्षात येते.” असंही क्षितीने यावेळी सांगितलं.

दरम्यान, दामिनी देशमुख सारख्या आव्हानासमोर अर्जुन स्वत:ला कसा सिद्ध करणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल. आता क्षितीची एन्ट्री झाल्यावर ‘ठरलं तर मग’ मालिका कोणत्या वळणावर जाणार हे पाहण्यासाठी सगळेच आतुर झाले आहेत. हा भाग ५ एप्रिलला प्रसारित होणार आहे.