Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत नुकतीच एका नवीन पात्राची एन्ट्री झालेली आहे. काही दिवसांपूर्वी मधुभाऊंच्या केससंदर्भात साक्षी शिखरेने कोर्टात खोटी साक्ष दिलेली असते. यावेळी तिने अथर्व विचारेचा मृत्यू झाल्याचा उल्लेख केलेला असतो. मात्र, साक्षी शिखरे खोटं बोलतेय याची अर्जुनला खात्री असते. म्हणून तो याप्रकरणी पुन्हा चौकशी करतो. अर्जुनला तपास करताना अथर्व विचारेचा फोटो सापडतो. हा फोटो तो आपल्या बायकोला म्हणजेच सायलीला दाखवतो.
अथर्व विचारेच्या रुपात मालिकेत अनिरुद्ध जोशी हा अभिनेता एन्ट्री घेणार आहे. अथर्व हा या केसचा मुख्य साक्षीदार असल्याने काही केल्या त्याला शोधून काढलं पाहिजे असं अर्जुन सायलीला सांगतो. यानंतर सायली देवाचा धावा करू लागते. यादिवशी सुभेदारांच्या घरी महाशिवरात्रीनिमित्त पूजेचं आयोजन करण्यात आलेलं असतं. एवढ्यात सायलीच्या डोळ्यासमोर अथर्व विचारे येतो. त्याला पाहताच ती काहीशी आश्चर्यचकीत होते पण, लगेच देवाचे आभार मानते. यानंतर अर्जुन-सायली अथर्व विचारेची संवाद साधतात.
अर्जुन-सायली अथर्व विचारेला साक्षीने कोर्टात सादर केलेले सगळे पुरावे आणि तिने खोटी साक्ष कशी दिली हे सांगतात. स्वत:चं आधार कार्ड आणि अन्य कागदपत्रं पाहून अथर्व विचारे गोंधळून जातो. अथर्व म्हणतो, “ही सगळी कागदपत्रं माझीच आहेत… म्हणजे मला काहीतरी होऊ शकतं अशा परिस्थितीत मी अडकलोय का?” अर्जुन यावर म्हणतो, “ज्या माणसांनी तुझी ओळख वापरलीये, ती माणसं स्वत:च्या स्वार्थासाठी कोणाचाही जीव घेऊ शकतात.” अर्जुनचं बोलणं ऐकून अथर्व विचारेला घाम फुटतो.
सायली त्याला पुढे म्हणते, “दादा माझ्या वडिलांना सोडवण्यासाठी तरी मदत करा. तुमच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत.” यानंतर अथर्व या दोघांची मदत करण्यास तयार होतो. पण, मालिकेत आता नवीन ट्विस्ट येणार आहे. हा नव्याने एन्ट्री घेऊन आलेला साक्षीदार अवघ्या एका दिवसांत गायब होणार आहे. चैतन्य त्याला शोधून हतबल होतो, शेवटी तो अर्जुनला सांगतो, “अथर्व विचारे घरात कुठेच दिसत नाहीये. गायब झालाय, कदाचित पळून गेला.” ही माहिती लगेच अर्जुन सायलीला सांगतो. अथर्व पळून गेलाय हे ऐकताच दोघांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला असल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
आता अर्जुन-सायली या परिस्थितीतून कसा मार्ग काढणार? अथर्व विचारे पळून गेल्याने साक्षी शिखरेला हरवणं हे आता सहज शक्य नाहीये. त्यामुळे आता मालिकेत काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.