Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत आता अर्जुन-सायलीच्या सुखी संसाराला सुरुवात झालेली आहे. मात्र, या दोघांना नवरा-बायको म्हणून सुभेदार कुटुंबीयांनी स्वीकारलेलं नाहीये. प्रतिमा, प्रताप, कल्पना हे तिघेही सायलीच्या विरोधात असतात. गृहप्रवेश करताना तिला घरात सुद्धा घेत नाहीत. पण, अर्जुन ठामपणे आपल्या बायकोची बाजू घेत तिला सुभेदारांच्या घरात घेतो. अर्जुनमुळे सायली घरात आली असली तरीही, अद्याप सायलीने बनवलेलं जेवण किंवा सुनेने बनवलेला कोणताही पदार्थ खाणार नाही असं सुभेदारांनी ठरवलेलं असतं. त्यामुळे आता सगळे बाहेर गेलेले असताना विमलच्या नावाने सायली सर्वांसाठी जेवण बनवण्याचा प्लॅन करणार आहे.
एकीकडे सुभेदारांचे कौटुंबिक वाद चालू असताना, दुसरीकडे अर्जुन मधुभाऊंची केस सोडवण्याच्या मागे असतो. तो केससंदर्भात नवनवीन पुरावे शोधत असतो. याचदरम्यान जोशी वकिलांचा खोटेपणा अर्जुन आता मधुभाऊंसमोर उघड करणार आहे. अर्जुन प्लॅन बनवून महिपत आणि जोशी वकिलांच्या भेटीची क्लिप मधुभाऊंना दाखवणार आहे. अखेर भक्कम पुरावा पाहिल्यावर मधुभाऊ आता जावयाची बाजू घेणार आहेत. अर्जुन जोशी वकिलांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याला या विश्वासघाताचा जाब विचारणार आहे. याशिवाय खोटं वागल्याबद्दल अर्जुनकडून त्याला पुन्हा मारहाण देखील करण्यात येईल. या सगळ्या घडामोडी सुरू असताना दुसरीकडे अर्जुनच्या हाती अथर्व विचारेचा फोटो लागतो.
खूनाच्या रात्री मी अथर्व विचारेच्या अंतिमविधीला गेले होते असा जबाब साक्षी शिखरेने कोर्टात दिलेला असता. याच पार्श्वभूमीवर अर्जुन सायलीला म्हणतो, “खूनाच्या रात्री साक्षी या अथर्व विचारेच्या अंत्यविधीला गेली होती असं म्हणाली होती. आपल्या केससाठी हा माणूस खूप महत्त्वाचा आहे.” यावर सायली देवाचा धावा करू लागते. काही करून आमच्या हाती मोठा पुरावा लागूदेत असं मागणं सायली देवाकडे मागते.
महाशिवरात्री विशेष भाग २७ फेब्रुवारी रात्री ८.१५ वाजता प्रसारित केला जाणार आहे. या भागात सायलीच्या समोर अथर्व विचारे येणार आहे. त्याला पाहताच सायलीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो कारण, साक्षीने अथर्व विचारेचा मृत्यू झालाय असा जबाब कोर्टात दिलेला असतो. पण, प्रत्यक्षात मात्र अथर्व विचारे जिवंत असतो. याच अथर्व विचारेची भूमिका साकारण्यासाठी मालिकेत एका नव्या अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे.
मालिकेत नव्या अभिनेत्याची एन्ट्री
अथर्व विचारे म्हणून मालिकेत अभिनेता अनिरुद्ध जोशी एन्ट्री घेणार आहे. यापूर्वी तो स्पृहा जोशीच्या ‘सुख कळले’ या मालिकेत झळकला होता. तर, लोकप्रिय मालिका ‘जय मल्हार’मध्ये अनिरुद्धने नारद ऋषींची भूमिका साकारली होता. आता अभिनेता महाशिवरात्रीच्या विशेष भागात ‘ठरलं तर मग’ मालिकेत एन्ट्री घेणार आहे.