‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. दीड वर्षापासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. आताच्या घडीला ही मालिका एका रंजक वळणावर येऊन पोहोचलीय. या मालिकेत साक्षीच्या गुन्हांचा पाढा वाचला जातोय. साक्षीच्या विरोधात पुरावे गोळा करून, चैतन्य, अर्जुन व सायलीनं तिला अडकवण्याची चांगलीच तयारी केली आहे. साक्षीविरोधात सध्या न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असल्याचा सीक्वेन्स या मालिकेत सुरू आहे. लवकरच या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे.
‘ठरलं तर मग’चा नवा प्रोमो नुकताच समोर आलाय. नव्या आलेल्या प्रोमोमध्ये लवकरच साक्षीचा खरा चेहरा समोर येणार, असं दिसतंय. या प्रोमोमध्ये अर्जुन सायलीला सांगतो, “साक्षी वात्सल्य आश्रमात आली आणि तिनंच विलासचा खून केला. आता चैतन्य या खुनाचे पुरावे त्या किलरकडूनच मिळवेल.”
हेही वाचा… अर्जुन कपूरशी ब्रेकअपच्या चर्चांवर मलायका अरोराने सोडलं मौन; म्हणाली, “नाही, या सगळ्या…”
हे सगळं सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला प्रिया आणि नागराज रुग्णालयातून एक मृतदेह मिळवतात आणि तो सायलीच्या आईचा मृतदेह आहे असं पटवण्याच्या तयारीत असतात जेणेकरून ती कायमची हे विश्व सोडून गेलीय यावर सगळ्यांचा विश्वास बसेल. हे दृश्य सुरू असताना प्रिया म्हणते, “किल्लेदार आणि सुभेदार दोन्ही कुटुंबांना कळू दे की त्यांची प्रतिमा गचकलीय.”
अर्जुन-सायलीच्या या प्रयत्नांना चैतन्यमुळे यश मिळत असतं. न्यायालयात साक्षीविरुद्ध असलेले सगळेच पुरावे सिद्ध झाल्यानं चैतन्य साक्षीवर रागावण्याचं नाटक करतो. पुराव्यांची जमवाजमव करण्यासाठी तो साक्षीला पुन्हा एकदा विचारतो, “विलासच्या खुनाच्या रात्री जे काही झालं, ते सगळं मला खरं खरं सांग. जर तू मला सांगितलंस, तर मी तुला सोडवू शकेन ना.” या वेळेस पुराव्यांसाठी तिथे मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू असते.
साक्षीला विश्वासात घेऊन जेव्हा चैतन्य तिच्याकडून खरं वदवून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा साक्षी त्याला सांगते, “विलासचा खून झाला त्या रात्री मी…” साक्षीला तुरुंगवास व्हावा याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतायत. साक्षीचा लवकरच पर्दाफाश होईल आणि सत्य सगळ्यांसमोर येईल, असं या प्रोमोवरून दिसून येतंय.
दरम्यान, साक्षी चैतन्यला सगळं खरं सांगेल का? विलासच्या खुनाची कबुली ती चैतन्यसमोर देईल का? किंवा साक्षी काही नवी खेळी खेळून, ती चैतन्य, अर्जुन सायली यांनाच त्यात अडकवेल? हे येत्या भागांमध्ये स्पष्ट होईल.
© IE Online Media Services (P) Ltd