अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपीच्या शर्यतीत गेल्या कित्येक महिन्यांपासून अव्वल स्थानावर आहे. ‘ठरलं तर मग’ मध्ये येणारे नवनवे ट्विस्ट आणि रंजक कथानकामुळे मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. जुई यात ‘सायली’ हे पात्र साकारत आहे. आईपासून दुरावलेल्या सायलीचे बालपण अनाथ आश्रमात जाते मात्र, आता लवकरच सायली आणि तिच्या आईची मंदिरात अप्रत्यक्ष भेट होणार आहे. मालिकेचा नवा प्रोमो पाहून चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
जुई गडकरीने मालिकेत येणाऱ्या नव्या कथानकाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मालिकेतील प्रमुख पात्र ‘सायली’ आणि तिची आई ‘प्रतिमा’ या मायलेकींची भेट होईल का? असा प्रश्न चाहत्यांना प्रोमो पाहिल्यावर पडला आहे. सायली आणि तिची सासू मंदिरात गेल्यावर मालिकेतील खलनायिका प्रिया सायलीविरुद्ध कटकारस्थान रचते. यावेळी मंदिरात सायलीची आई प्रतिमा चेहरा लपवून तिची मदत करते आणि निघून जाते असे दाखवण्यात आले आहे. यानंतर सायली सासूसह मदत केलेल्या बाईचा शोध घेण्याचा प्रयत्न करते असे प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : Video : “शेजारी नक्की काय चाललंय…”, प्रसाद ओकने शेअर केला हास्यजत्रेच्या सेटवरील मजेशीर व्हिडीओ
सायलीची चेहरा लपवून मदत करणाऱ्या प्रतिमाची भूमिका मालिकेत ‘बाईपण भारी देवा’ फेम अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी साकारली आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये सुरुवातीचे काही एपिसोड शिल्पा नवलकर यांनी प्रतिमाचे काम केले होते. त्यानंतर आता कथानकानुसार पुन्हा एकदा त्या मालिकेत एन्ट्री घेण्यास सज्ज झाल्या आहेत. जुई गडकरी नवा प्रोमो शेअर करत म्हणाली, “हा भाग पाहायला विसरु नका.”
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/08/image-80.png?w=454)
शिल्पा नवलकर म्हणजेच प्रतिमा पात्राच्या एन्ट्रीमुळे मालिकेत मोठे बदल होतील. सायली आणि प्रतिमाची भेट झाल्यास खलनायिका प्रियाचा खरा चेहरा सर्वांसमोर येईल असा अंदाज नेटकरी बांधत आहेत. मात्र, या मायलेकींची भेट होणार की नाही? हे आपल्याला आगामी एपिसोडद्वारे पाहायला मिळेल. दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून गेले कित्येक महिने ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा पहिल्या क्रमांकावर आहे.