Tharla Tar Mag Serial New Track : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सुभेदारांच्या घरातून सायलीला बाहेर हाकलून दिल्याचा सीक्वेन्स चालू आहे. सायली-अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सर्वांसमोर आल्याने, या दोघांची मालिकेत आता काही काळापुरती ताटातूट झालेली आहे. कल्पना सुनेला हाताला धरून घराबाहेर काढते. यामुळे अर्जुन पूर्णपणे बिथरतो. तर, दुसरीकडे घराबाहेर काढलेल्या लेकीला मधुभाऊ घेऊन जातात.
सायलीसमोर प्रेम व्यक्त करता आलं नाही याचीही खंत अर्जुनच्या मनात असते. पण, प्रियाने अत्यंत चुकीच्या प्रकारे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाइल सर्वांसमोर आणल्याने अर्जुनवर विश्वास ठेवायला कोणीही तयार नसतं. सगळे सुभेदार कुटुंबीय अर्जुन सायलीच्या विरोधात बोलत असतात. अगदी मधुभाऊ सुद्धा लेकीची बाजू घेत नाहीत. आता अर्जुन-सायलीला त्यांच्या कुटुंबीयांनी वेगळं केल्याने मालिकेत लवकरच एक नवीन ट्रॅक सुरू होणार आहे. यासाठी सायलीचा लूक देखील बदलण्यात आला आहे.
सायली-अर्जुनमध्ये दुरावा…
‘ठरलं तर मग’ ( Tharla Tar Mag ) मालिकेत सायली नेहमी साडी नेसून, केस मोकळे, थोडेफार दागिने या लूकमध्ये असायची. पण, माहेरी परतल्यावर आता प्रेक्षकांना केसाला वेणी, ड्रेस घालणारी आणि अर्जुनच्या विरहात दु:खी असलेली सायली प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पण, हिच सायली सगळं पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्याचा निश्चय देखील करणार आहे.
घडलेल्या सगळ्या प्रसंगानंतर सायली-अर्जुनचं बोलणं झालेलं नसतं. त्यामुळे नवऱ्याचा फोन केव्हा येतोय, याची ती आतुरतेने वाट पाहत बसलेली असते. इतक्यात तिचा फोन वाजतो पण, सायली फोन उचलायला जाताच मधुभाऊ तिथे येतात आणि तिचा हात धरतात. सायलीला अडवून ते म्हणतात, “आता जर तू अर्जुनच्या संपर्कात राहशील, तर माझं मेलेलं तोंड बघशील.” यानंतर अर्जुनचा फोन कट करण्यात येतो. सायली फोन उचलत नाहीये या विचाराने अर्जुन प्रचंड अस्वस्थ होतो. सायलीला सुद्धा काही केल्या मधुभाऊंच्या शब्दाचं पालन करणं भाग असतं.
‘ठरलं तर मग’मध्ये ( Tharla Tar Mag ) हे नवीन वळण सुरू झाल्यावर मालिकेत अजून रंगत येणार आहे. सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा सुरळीत व्हाव्यात यासाठी सायली मालिकेत देवीआईची प्रार्थना करताना दिसेल. याचे विशेष भाग लवकरच सुरू होतील असं ‘स्टार प्रवाह’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर सांगण्यात आलं आहे. यामध्ये जानकी, मुक्ता आणि सायली या तीन नायिका सत्यासाठी लढणार आहेत. आता भविष्यात सायली-अर्जुन एकत्र येणार की नाहीत? खरी तन्वी कोण आहे हे सत्य सुभेदारांसमोर केव्हा येणार या सगळ्या गोष्टींचा उलगडा मालिकेत ( Tharla Tar Mag ) केव्हा होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.