Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या प्रिया आणि अश्विनच्या लग्नाचा सीक्वेन्स चालू आहे. प्रिया गोड बोलून अश्विनला आपल्या जाळ्यात ओढते आणि त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेते. प्रियाच्या बोलण्यात अश्विन सहज अडकतो आणि आपल्या आई-बाबांना प्रियाशी लग्न करण्याच्या निर्णयाबद्दल सांगतो. सुभेदार कुटुंबीय अश्विन-प्रियाचं लग्न अर्जुन-सायलीपासून लपवण्याचा निर्णय घेतात.

कल्पना, प्रताप आणि पूर्णा आजी हे तिघेजण प्रियाला लग्नाचं मागणं घालण्यासाठी किल्लेदारांच्या घरी जातात. लग्नाची गोष्ट अर्जुन-सायली आणि रविराज किल्लेदारांपासून लपवून ठेवायची असा निर्णय घेण्यात येतो. यानुसार अश्विन-प्रिया कोर्टात लग्न करण्याचा निर्णय घेतात. सायलीला सासूबाई आणि पूर्णा आजीच्या वागण्यावर शंका येऊ लागते. घरात नक्कीच काहीतरी प्लॅन शिजतोय याचा तिला पुरेपूर अंदाज येतो. तिच्या हाती सोनं खरेदी केल्याची बिलं देखील लागतात. त्यामुळे सायली प्रतिमाला फोन करते. पण, प्रतिमा देखील सायलीपासून अश्विन-प्रियाच्या लग्नाचं सत्य लपवून ठेवते.

अश्विन आणि प्रियाचं लग्न कोर्टात पार पडतं. यानंतर दोघेही सुभेदारांच्या घरी पोहोचतात. यावेळी प्रिया गृहप्रवेश करण्याआधी सासरच्यांसमोर एक अट ठेवते. ती कल्पनाला सांगते, “माझा गृहप्रवेश सायलीने करावा अशी माझी इच्छा आहे कारण, मला सगळं आधीचं विसरून एक नवीन सुरुवात करायची आहे.” यावर पूर्णा आजी म्हणते, “आपण सायलीला आपल्या घरचं मानत नाही.” पण, प्रिया तिच्या मतावर ठाम असते. प्रियाची अट ऐकून सायली-अर्जुनला तिच्या वागण्याचा वेगळाच संशय येऊ लागतो.

आता सायली-अर्जुन लवकरच वात्सल्य आश्रम केसचा पुढील तपास करण्यासाठी एका बुटिकमध्ये जाणार आहेत. हे तेच बुटिक असतं ज्याचा टॅग आश्रमात सापडलेला असतो. या बुटिकमधून साक्षी शिखरे कपडे खरेदी करते असं आधीच चैतन्यने सायली-अर्जुनला सांगितलेलं असतं. साक्षीची रजिस्टरवरील एन्ट्री सायली-अर्जुन शोधत असतात. सायली खूप वेळ शोधाशोध करते आणि अखेर तिला साक्षी त्याच दुकानातून ड्रेस घेत असल्याचा पुरावा सापडतो.

सायली अर्जुनला मोठ्याने पुरावा सापडला असं सांगते. पण, तेवढ्यात या दुकानात कोणाची तरी एन्ट्री होते. त्या व्यक्तीला बघून अर्जुन-सायलीला धक्का बसतो. आता ही दुकानात आलेली व्यक्ती नेमकी कोण आहे हे ‘ठरलं तर मग’ मालिकेत येत्या २४ मार्चला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Story img Loader