‘ठरलं तर मग’ ही स्टार प्रवाहवरील मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय. सायली-अर्जुनच्या जोडीने चाहत्यांच प्रेम मिळवलंय. ही मालिका आता एका रंजक वळणावर येऊन पोहोचलीय. सायलीनं सगळ्यांसमोर अर्जुनवर प्रेम असल्याची शपथ घेतल्यानंतर अर्जुनच्या मनात गैरसमज निर्माण झालाय. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पेपर्सवरील त्या एका क्लॉजमुळे अर्जुननं त्याच्या भावना अजूनही मनातच कोंडून ठेवल्यात.
सध्या मालिकेमध्ये अर्जुन सायलीशी वाईट वागतो, रागावतो, ओरडून बोलतो आणि त्यामुळे सायलीदेखील दुखावते, असा सीक्वेल सुरू आहे. सायली तिच्या मनातल्या भावना तिची आश्रमातली जुनी मैत्रीण कुसुमसमोर व्यक्त करते. तिचं अर्जुवर खूप प्रेम आहे; पण अर्जुनच्या मनात तिच्याबद्दल काही नाही, असंही ती कुसुमला सांगते. हे सांगत असताना सायलीचे अश्रू अनावर होतात. तर दुसऱ्या बाजूला अर्जुनदेखील खूप अस्वस्थ असतो. त्यालाही असंच वाटतं की, सायलीच्या मनात त्याच्याबद्दल काहीच नाही आणि त्यामुळे सायलीशी कठोर वागण्याचा निर्णय अर्जुन घेतो. या गैरसमजामुळे दोघांमध्ये आता दुरावा निर्माण होणार की काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय.
हेही वाचा… ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन; रंगभूमीवर घेतला अखेरचा श्वास
नुकताच ‘ठरलं तर मग’चा नवा प्रोमो आलाय. नव्या प्रोमोमध्ये अर्जुन आणि सायली नाश्त्यासाठी बसले असताना, सायलीला होत असलेला त्रास नकळत अर्जुनला कळतो. अर्जुन सायलीला विचारतो, “डोळ्यांना काय झालंय.” त्यावर सायली म्हणते, “काही नाही.” मग अर्जुन सायलीला विचारतो, “तू रडलीयस का?”
अर्जुनमुळे सायलीला झालेला त्रास तिच्या मैत्रिणीला म्हणजेच कुसुमला सहन होत नाही. सायलीनं तिचं प्रेम कुसुमसमोर व्यक्त केल्यानंतर कुसुम अर्जुनला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये जाते आणि त्याला ठणकावून सांगते. कुसुम म्हणते, “आता तुमच्या कॉन्ट्रॅक्टचे काहीच दिवस शिल्लक आहेत. आता तुम्ही मला वचन द्या, हे कॉन्ट्रॅक्ट माझ्या सायलीला आयुष्यभर महागात पडणार नाही, असंच तुम्ही वागाल.” कुसुम वचनासाठी तिचा हात पुढे करते. त्यामुळे अर्जुन विचारात पडतो.
दरम्यान, सायली आणि अर्जुनमध्ये निर्माण झालेला हा गैरसमज कधी दूर होणार? दोघं एकमेकांना प्रेमाची कबुली देतील का? की अर्जुन आणि सायलीच्या नात्यात कायमचा दुरावा निर्माण होईल? या सगळ्या गोष्टींचा उलगडा पुढील भागांमध्ये करण्यात येईल.