Tharla Tar Mag New Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सायलीने अखेर अर्जुनसमोर प्रेमाची कबुली दिल्याचा सीक्वेन्स चालू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या सीनची आतुरतेने वाट पाहत होते. यापूर्वी अर्जुनने सायलीला भर एसटी स्टँडवर गुडघ्यावर बसून प्रपोज केलेलं असतं. पण, तेव्हा मधुभाऊंना दिलेल्या वचनामुळे सायली आपल्या नवऱ्याला कोणतंच उत्तर न देता निघून जाते. त्यामुळे मिसेस सायलीच्या मनात नेमकं काय आहे हा विचार करून अर्जुन देखील संभ्रमात पडतो.
अर्जुन काही केल्या आपले प्रयत्न सोडत नाही. कल्पनाने घराबाहेर काढल्यापासून सायली मधुभाऊंच्या घरी जाऊन राहत असते. त्यामुळे, अर्जुन सुद्धा वारंवार त्याठिकाणी आपल्या बायकोला भेटण्यासाठी जात असतो. प्रियाला हे अजिबात आवडत नसतं. सायली आणि अर्जुनच्या नात्यात तिला दुरावा निर्माण करायचा असतो. प्रिया संधी साधून पत्रकार परिषदेचा व्हिडीओ सुभेदार कुटुंबीयांना दाखवते. तसेच अर्जुन आजकाल रोज चाळीत ( मधुभाऊंच्या घरी ) जातो. यामुळे त्याचं नाव खराब होईल अशी भीती सुद्धा ती, पूर्णा आजी आणि कल्पनाच्या मनात निर्माण करते. यावर पूर्णा आजी या सगळ्यावर लवकरात लवकर कायमचा उपाय केला पाहिजे असा निर्णय घेते.
पूर्णा आजीने घेतला मोठा निर्णय
दुसरीकडे, अर्जुनवर चाळीत हल्ला केला जातो. आपल्या नवऱ्याला मारहाण होतेय हे पाहताच सायलीचा जीव कासावीस होतो. ती पटकन “अहो…” ओरडते. एवढ्यात अर्जुनवर पाठीमागून वार केला जातो आणि तो जमिनीवर पडतो. यानंतर त्याची शुद्ध हरपते. हे सगळं पाहून सायली प्रचंड अस्वस्थ होते. मधुभाऊंचा हात झटकून ती नवऱ्याकडे जाते. त्याला उठवण्याचा प्रयत्न करते. शेवटी सायली आपल्या प्रेमाची कबुली देत, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे अर्जुन सर असं म्हणते. बायकोचे हे शब्द ऐकताच अर्जुन पटकन डोळे उघडतो…त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो.
पुढे, सायली अर्जुनला मलमपट्टी करत असते. तो प्रेमाने आपल्या बायकोला धीर देतो आणि म्हणतो, “एक दिवस घरचे सगळे तुम्हाला परत घरी बोलावतील. सर्वांचं मन जिंकून तुम्ही पुन्हा घरी याल.” हे सगळं झाल्यावर अर्जुन घरी जातो. इतक्यात वडील प्रताप सुभेदार त्याला म्हणतात, “जरा बस आम्हाला तुझ्याशी बोलायचंय.” यावर अर्जुन म्हणतो, “काय झालं डॅड?” यानंतर पूर्णा आजी तिचा महत्त्वाचा निर्णय सर्वांना सांगते.
आता झालं गेलं विसरून जाऊया आणि आपण सगळे पुढचा विचार करूयात. तुझ्या आणि तन्वीच्या ( प्रिया ) लग्नाचा निर्णय घेतल्याचं पूर्णा आजी नातवाला सांगते. हे ऐकून अर्जुनच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. तो, या निर्णयावर संताप व्यक्त करणार हे प्रोमोमध्ये त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. आता या सगळ्यावर अर्जुन काय निर्णय घेणार, घरच्यांना काय सांगणार? हे येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.