‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सुभेदार कुटुंबीयांनी अर्जुन आणि प्रियाच्या लग्नासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. पूर्णा आजीला दिलेल्या वचनामुळे अर्जुन मनाविरुद्ध हे लग्न करणार असतो. पण, सायलीने मात्र काही केल्या ‘मी माझ्याच नवऱ्याशी लग्न करेन’ असा निश्चय मालिकेत केलेला आहे. यासाठी ती चैतन्य आणि कुसुम या दोघांना हाताशी घेऊन विविध प्रयत्न करताना दिसत आहे. आता सायली-अर्जुनचं लग्न लावण्यात ऐनवेळी कोण पुढाकार घेणार या गोष्टी मालिकेच्या आगामी भागात स्पष्ट होतील. पण, त्याआधी एका रोमँटिक प्रोमोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सायली आणि अर्जुन यांच्यासह या आठवड्यात संपूर्ण ‘ठरलं तर मग’ मालिकेची टीम सिद्धार्थ जाधवचा शो ‘आता होऊ दे धिंगाणा ३’मध्ये सहभागी होणार आहे. या शोमध्ये येत्या भागात प्रेमाचा आठवडा साजरा करण्यात येणार आहे. याची पहिली झलक नुकतीच समोर आली आहे. प्रोमोच्या सुरुवातीला अर्जुन सुंदर बासरी वाजवत असल्याचं पाहायला मिळतं. यानंतर सायली आपल्या मनातील भावना सर्वांसमोर व्यक्त करते.
अर्जुन या शोमध्ये पहिल्यांदाच बासरी वाजवणार आहे. त्याच्या बासरीचा सुमधूर आवाज ऐकून सगळेच तृप्त होतात. यानंतर सायली म्हणते, “गळ्यात घालून प्रेमाचा हार यावेळी तरी करशील का साता जन्मीच्या सोबतीचा करार” याचा अर्थ आता सायली अर्जुनबरोबर थेट साता जन्मीचं कॉन्ट्रॅक्ट करणार आहे. बायकोचे हे शब्द ऐकताच अर्जुन गुडघ्यावर बसून तिच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे. यानंतर सायली ‘टिक टिक वाजते डोक्यात’ हे गाणं देखील गाणार आहे.
यानंतर अर्जुन आणि सायली ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या मंचावर रोमँटिक डान्स करणार आहेत. यावेळी संपूर्ण मंचावर लाल फुगे, फुलांची उधळण केली जाते. हा क्षण पाहून ‘ठरलं तर मग’ मालिकेचे चाहते देखील सुखावले आहेत. नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सायली-अर्जुनचं बॉण्डिंग सर्वांच्या पसंतीस उतरलं आहे.
दरम्यान, ‘आता होऊ दे धिंगाणा ३’चा हा विशेष भाग येत्या शनिवार-रविवारी रात्री ९ वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे.