Tharla Tar Mag : गेल्या काही दिवसांपासून ‘ठरलं तर मग’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या दोन मालिकांचा महासंगम प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. अर्जुनने भर कोर्टात साक्षी शिखरेचा खोटेपणा सिद्ध केल्यामुळे महिपत खूप संतापतो. मधुभाऊंच्या जीवाला महिपतपासून धोका असतो, तो त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न सुद्धा करतो. यामुळेच, सायली जानकीला फोन करून काही दिवस मधुभाऊंना तिच्या घरी ठेवण्याची विनंती करते.

मधुभाऊ जानकीकडे सुखरुप राहतील आणि त्यानंतर अर्जुनला आश्रम केसचा सखोल तपास करता येईल हा यामागचा उद्देश असतो. यानुसार अर्जुन कामाला लागतो. विलासचा खून होण्याआधी तो जेलमध्ये होता मग, त्याची सुटका करणारा रविकांत देशमुख कोण आहे याचा शोध सध्या अर्जुन घेत आहे. मात्र, हा तपास करताना अनेक लोकांनी महिपतशी हातमिळवणी केली असल्याचं अर्जुनला लक्षात येतं. यामुळेच या केसचा पुढील तपास करण्यासाठी अर्जुनने एक युक्ती लढवली आहे.

अर्जुन आश्रम केसचा पुढील तपास करण्यासाठी सायलीबरोबर एका बुटिकमध्ये ( सलोन ) जाण्याचा निर्णय घेतो. मात्र, त्याठिकाणी गेल्यावर स्वत:ची ओळख लपवणं गरजेचं असतं. यामुळे अर्जुन बायकोला लूक बदलून आपण या केसचा तपास करू असा सल्ला देतो. आता सायली-अर्जुन एका वेगळ्याच लूकमध्ये या केसच्या पुढील तपासासाठी जाणार आहेत.

वनपीस, डोळ्याला गॉगल आणि हटके हेअरस्टारइल करून सायली अर्जुनसमोर येते. सायलीला या वेगळ्या लूकमध्ये पाहून अर्जुन थक्क होतो. नेहमी साध्याभोळ्या लूकमध्ये राहणाऱ्या सायलीला वनपीस घालून बुटिकमध्ये जाणं हे थोडं अवघडल्यासारखं वाटतं. ती म्हणते, “आपण हे असं काहीतरी तयार होऊन जायची गरज आहे का बुटिकमध्ये? आपण नेहमीच्या कपड्यात का नाही जाऊ शकत? “

अर्जुन यावर म्हणतो, “हे बघा आपण मर्डर केससंदर्भात पुरावे गोळा करण्यासाठी आणि याचा पुढील तपास करण्यासाठी तिथे जातोय. ही अशी मर्डर केस आहे ज्यात महिपत सहभागी आहे आणि त्याला बहुतेकजण ओळखतात. त्यामुळे असं जाणं गरजेचं आहे.” यानंतर अर्जुन देखील नेहमीपेक्षा काहीशा वेगळ्या लूकमध्ये तयार होतो.

सायली नवऱ्याला पाहून म्हणते, “तुम्ही खूप देखणे दिसताय आणि अर्जुन सुभेदार अजिबात वाटत नाही आहात.” बायकोची प्रतिक्रिया ऐकून अर्जुन खूश होऊन म्हणतो, “म्हणजे त्या बुटिकमध्ये आपल्याला आता कोणीही ओळखणार नाही आणि कोणाला शंका देखील येणार की, आपण आश्रम केसचा तपास करण्यासाठी आलो आहोत.”

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेत अर्जुन सायली वेगळ्या लूकमध्ये झळकणार असल्याने हा प्रोमो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.