Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन आणि प्रियाचा लग्नसोहळा सुरू असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. मात्र, काही केल्या ‘माझ्या नवऱ्याशी मीच पुन्हा एकदा लग्न करणार’ या मतावर सायली ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. मधुभाऊंचा आशीर्वाद घेऊन सायली अर्जुन आणि प्रियाचं लग्न थांबवण्यासाठी घराबाहेर पडते. सायलीला लग्नमंडपात येऊ न देण्यासाठी प्रियाने आधीच प्लॅन केलेला असतो. पण, सायली यावेळी चांगलीच हुशारीने वागते. ती एका वेगळ्याच रुपात मांडवात एन्ट्री घेणार आहे.
‘स्टार प्रवाह’च्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या लगीनघाई चालू आहे. पूर्णा आजीच्या इच्छेखातर अर्जुन आणि तन्वीच्या विवाहाचा घाट घालण्यात आला आहे. मात्र हे लग्न पार पडणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. कारण, सायलीने अर्जुन आणि तन्वीचं लग्न होऊ द्यायचं नाही हे मनाशी पक्कं ठरवलं आहे. अगदी मेहंदीपासून ते हळदी सोहळ्यापर्यंत सगळं काही सायलीच्या मनासारखं घडत आहे. या सगळ्या गोष्टी घडवून आणण्यासाठी सायलीने वेगवेगळे वेषही धारण केले आहेत. ऐन लग्नातही ती बँडवाल्यांच्या रुपात लग्नमंडपात पोहोचणार आहे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे १४ फेब्रुवारी अर्थात ‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या दिवशीच अर्जुन-सायली आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं वचन देणार आहेत. त्यामुळे यंदाचा ‘व्हॅलेंटाइन्स डे’ आणि ‘ठरलं तर मग’चा विवाहसोहळा खऱ्या अर्थाने स्पेशल ठरणार आहे.
अर्जुन-सायलीने पुन्हा एकत्र यावं ही अवघ्या महाराष्ट्राची इच्छा आहे. प्रेक्षक या दिवसाची गेल्या बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. अखेर ‘ठरलं तर मग’ मालिकेत तो क्षण जवळ आला आहे. सायली आणि अर्जुनचं लग्न झाल्याचा पहिला फोटो आता प्रेक्षकांसमोर आलेला आहे. यामध्ये सायलीने साडी नेसून पारंपरिक लकू केल्याचं पाहायला मिळालं. तर, अर्जुनने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती. या शेरवानीवर त्याने सायलीची गुलाबी ओढणी घेतली आहे.
![tharla tar mag](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/image_12d01e.png)
सायली आणि अर्जुन लग्नबंधनात अडकल्याचा पहिला फोटो आता सर्वांसमोर आला आहे. यामध्ये अर्जुन-सायली आनंदी तर, प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडाल्याचं पाहायला मिळत आहे. सायलीने बोलल्याप्रमाणे करुन दाखवत प्रियाला जन्माची अद्दल घडवली आहे. आता लग्नानंतर सायलीला सुभेदार कुटुंबीय आपलंसं करणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.