Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सायली सध्या रामनवमीच्या उत्सवाची तयारी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठी ती प्रतिमाला फोन करून सगळ्या सुभेदारांना तुमच्या घरी आमंत्रित करा अशी विनंती करते. सायलीने सांगितल्यानुसार, प्रतिमा कल्पनाला फोन करून सगळ्या सुभेदारांना रामनवमीचा उत्सव साजरा करण्यासाठी किल्लेदारांच्या घरी आमंत्रित करते. आता यावर रविराज किल्लेदार काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
प्रिया आणि अर्जुनचं लग्न मोडल्यामुळे रविराज किल्लेदार प्रचंड नाराज असतात. ते सुभेदार कुटुंबीयांशी सगळे संबंध तोडून टाकतात. इतकंच नव्हे तर, सायलीशी असलेलं त्यांचं नातं सुद्धा आधीसारखं राहत नाही. याशिवाय प्रियाने सुद्धा वडिलांना अंधारात ठेवून अश्विनशी लग्न केलेलं असतं. यामुळे रविराज किल्लेकार सुभेदारांवर प्रचंड नाराज असतात. सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबीय आता एकमेकांपासून दुरावलेत या गोष्टीची खंत सायलीच्या मनात देखील असते. त्यामुळेच दोन्ही कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी सायली रामनवमी साजरी करण्याचं ठरवते.
प्रतिमाने आमंत्रण दिल्यामुळे सगळे सुभेदार किल्लेदारांकडे जायला तयार होतात. याठिकाणी सुभेदारांची थोरली सून सायली किर्तनकाराच्या रुपात उभी असते. किर्तन सादर करून सायली घरातल्या प्रत्येकाचं मन वळवण्याचा प्रयत्न करते. “श्रीरामचंद्रांनी कुटुंबात सलोखा राहावा म्हणून वनवास पत्करला…माझ्यामुळे जर या कुटुंबातील दरी मिटणार असेल तर मी सुद्धा वनवासाला तयार आहे…” असं सायली सर्वांसमोर सांगते.
यानंतर सर्वांना नमस्कार करून सायली घर सोडून जाण्याचा निर्णय घेते. अर्जुन बायकोला थांबवण्यासाठी पुढे जात असतो पण, चैतन्य त्याला अडवतो. आता सायलीला घर सोडण्यापासून कोण थांबवणार असा विचार त्याच्या मनात सुरू असतानाच, रविराज किल्लेदार सायलीला आवाज देतात. सायली घराबाहेर पाऊल टाकणार इतक्यात किल्लेदार म्हणतात, “थांब सायली…थांब!”
आता रविराज किल्लेदार सायलीबाबत काय निर्णय घेणार? सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबातले वाद मिटवण्यात सायलीला यश येईल का? हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष भाग १० एप्रिलला रात्री ८:१५ वाजता प्रसारित केला जाणार आहे.