Tharla Tar Mag Maha Episode Updates : ‘ठरलं तर मग’ मालिकेत अखेर अर्जुनने सायलीसमोर प्रेमाची कुबली दिलेली आहे. सुभेदार कुटुंबीयांनी सायलीला घराबाहेर काढल्यामुळे दोघांच्या नात्यात दुरावा आलेला असतो. अर्जुन आपल्या बायकोला भेटण्याचा प्रयत्न सुद्धा करतो पण, मधुभाऊ याला विरोध करतात. काही करून सायलीने आता अर्जुनला विसरलं पाहिजे हा विचार करून मधुभाऊ सायलीला कोल्हापूरला पाठवण्याचा निर्णय घेतात.
अर्जुन सायलीला प्रपोज करणार हा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या महाएपिसोडमध्ये काय घडणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात होती. आता जाणून घेऊयात महाएपिसोडमध्ये नेमकं काय घडलं?
सायली सगळं सोडून कोल्हापूरला जातेय हे समजल्यावर अर्जुन लगेच एसटी स्टँडच्या दिशेने धाव घेतो. यावेळी सुभेदारांच्या घरी पूजा सुरू असते. पण, आपली बायको आपल्याला सोडून जाणार या विचाराने अर्जुन लगेच घराबाहेर निघतो यामुळे पूर्णा आजी प्रचंड नाराज होते. अर्जुन एसटी स्टँडवर आल्यावर आपली बायको नेमकी कुठे आहे याची शोधाशोध करतो. चैतन्य सुद्धा त्याला मदत करतो. दुसरीकडे कुसुम काही केल्या अर्जुन लवकर येऊदे यासाठी प्रार्थना करत असते.
सायली उत्तर न देता निघून जाणार…
अर्जुन शेवटी एसटी स्टँडच्या ऑफिसमध्ये जाऊन माइकवर बोलण्यासाठी परवानगी मागतो. अर्जुन माइकवर म्हणतो, “सायली मला सोडून जाऊ नकोस, सगळी चूक माझी आहे… मीच तुमच्यासमोर आधी प्रेमाची कबुली द्यायला हवी होती.”
अर्जुनचं हे बोलणं ऐकून सायलीला अश्रू अनावर होतात. सायली कुठे आहे हे समजल्यावर अर्जुन धावत येतो आणि बायकोला गुडघ्यावर बसून प्रपोज करतो. सायली सुद्धा आपलं प्रेम व्यक्त करणार इतक्यात तिला मधुभाऊंना दिलेलं वचन आठवतं. अर्जुनशी संपर्क ठेवायचा नाही असं वचन मधुभाऊंनी सायलीकडून घेतलेलं असतं. त्यामुळे सायली अर्जुनला काहीच उत्तर न देता निघून जाते.
हेही वाचा : वेगळ्या विनोदशैलीत गुंफलेला मु. पो. बोंबिलवाडी आगामी मराठी चित्रपटाच्या चमूची ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट
अर्जुन एसटीच्या मागे-मागे धावतो…तर, सायली बसमध्ये रडत असते. दोघेही भावुक झाल्याचं या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. पुढे, अगदी फिल्मी स्टाइलसारखी तिची ओढणी अर्जुनच्या गळ्यात येऊन पडणार आहे. यावरून सायली आणि मी नक्की एकत्र होणार असा अंदाज अर्जुन बांधतो. आता येत्या काळात मालिकेत कोणतं नवीन वळण येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.