Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सगळ्या कलाकारांनी नुकतीच ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्याला एकत्र उपस्थिती लावली होती. या मालिकेच्या टीमला गोल्डन रंगाची थीम दिली होती. यावेळी सगळे कलाकार वेस्टर्न लूकमध्ये रेड कार्पेटवर एन्ट्री घेताना दिसले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ठरलं तर मग’ मालिकेतील कलाकार रेड कार्पेटवर आल्यावर सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे सायलीच्या सासूबाईंनी. मालिकेत सायलीच्या सासूची म्हणजेच कल्पनाची भूमिका अभिनेत्री प्राजक्ता दिघे साकारत आहेत. गोल्डन रंगाच्या शेडची शिमरी साडी नेसून त्या रेड कार्पेटवर आल्या होत्या. मालिकेत साधीभोळी दिसणारी कल्पना खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस असल्याचं पाहायला मिळालं.

गोल्डन साडी, सिल्व्हलेस ब्लाउज, गळ्यात नाजूक हार, केसांचा बन या लूकमध्ये प्राजक्ता दिघे ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्याला पोहोचल्या होत्या. सध्या मालिकेत सासूबाई सायलीपासून रुसल्या असल्या तरीही खऱ्या आयुष्यात जुई आणि प्राजक्ता यांच्यात खूप सुंदर बॉण्डिंग असल्याचं रेड कार्पेटवर पाहायला मिळालं.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना जुई गडकरीला मालिकेच्या टीआरपीबद्दल विचारण्यात आलं. यावर अभिनेत्री म्हणाली, “मालिका एक नंबरला असणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. आपल्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आहेत याचा विचार करावा लागतो. मला नेहमी असं वाटतं की, टीआरपीचा तो एक नंबर टिकवणं खूप कठीण असतं. मुळात फक्त कलाकार नव्हे तर यामागे सगळं प्रोडक्शन हाऊस, क्रू मेंबर्स यांची सगळ्यांची मेहनत आहे. कलाकार स्क्रीनवर दिसतो पण, मागे जी टीम काम करते त्यांची मेहनत मोठी असते. त्यांचं काम पाहून आणखी जोमाने काम करण्याची इच्छा होते.”

“आता इथून पुढे मालिकेत प्रेक्षकांना धमाल बघायला मिळणार आहे. जसं मी नेहमी म्हणते, सत्याचा विजय होतो त्यामुळे तुम्हाला मालिकेत सुद्धा तेच पाहायला मिळेल की, सत्याचा विजय होईल.” असं जुई गडकरीने ‘टेली गप्पा’ युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना सांगितलं.

दरम्यान, आता १० मार्च ते १६ मार्च या दरम्यान ‘ठरलं तर मग’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या दोन मालिकांचा महासंगम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये जानकी आणि सायली या दोन नायिका खलनायिकांना अद्दल घडवून एकमेकींना मदत करताना दिसणार आहेत.