Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. यामध्ये सायलीच्या सासूबाईंची म्हणजेच कल्पनाची भूमिका अभिनेत्री प्राजक्ता दिघे साकारत आहेत.
प्राजक्ता दिघे यांनी आजवर ‘चार दिवस सासूचे’, ‘का रे दुरावा’ अशा गाजलेल्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. मालिकेचं शूटिंग सांभाळून मोकळ्या वेळात हे कलाकार सेटवर भन्नाट रील्स व्हिडीओ बनवत असतात. अशाच एका व्हिडीओमध्ये अभिनेत्री प्राजक्ता दिघे सुंदर डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
सायलीच्या सासूबाईंचा सुंदर डान्स पाहून नेटकऱ्यांचा आनंद सुद्धा गगनात मावेनासा झाला आहे. १९९९ मध्ये आमिर खान आणि मनीषा कोईराला यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मन’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. यामधील “तिनक तिन ताना” हे गाणं सर्वत्र गाजलं होतं. हे गाणं उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी गायलं आहे. याच गाण्यावर सायलीच्या सासूबाई थिरकल्या आहेत.
प्राजक्ता दिघे यांनी ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट संजना पाटील यांच्यासह या “तिनक तिन ताना” गाण्यावर ठेका धरला आहे. “कोणत्याही परिस्थितीत डान्स करायचा… ही आहे माझी डान्सिंग पार्टनर संजना” असं कॅप्शन देत प्राजक्ता यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
अभिनेत्रीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “सुंदर डान्स”, “तुमच्या सेटवर सर्वांचं कमाल बॉण्डिंग आहे”, “प्राजक्ता दिघे सुंदर अभिनेत्री” अशा प्रतिक्रिया युजर्सनी या व्हिडीओवर दिल्या आहेत. तर, अनेकांनी “प्लीज आमच्या सायलीशी नीट वागा” अशी विनंती अभिनेत्रीला या व्हिडीओवर कमेंट करत केली आहे.
दरम्यान, सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत अर्जुन- सायलीबद्दल सुभेदार कुटुंबीयांच्या मनात गैरसमज निर्माण झाल्याचा सीक्वेन्स चालू आहे. सायली-अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फोडून प्रिया सायलीला सर्वांपासून दूर करते. पण, आता लवकरच सुभेदारांच्या सुनेने म्हणजे सायलीने सगळं काही पूर्ववत करण्याचा निश्चय केला आहे. ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सध्या रात्री ८:१५ वाजता प्रसारित केली जाते.