‘ठरलं तर मग’ ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ५ डिसेंबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेने बघता बघता टीआरपीचे सर्व रेकॉर्ड्स मोडले. गेली दीड वर्षे ‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानी आहे. या मालिकेच्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मालिका टीआरपीमध्ये अव्वल स्थानी आहेच पण, नुकताच या मालिकेने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. यासंदर्भात मालिकेचा निर्माता सोहम बांदेकरने खास पोस्ट शेअर करत संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. मालिकेत जुई आपल्याला सायली हे पात्र साकारताना दिसते, तर अमितने अर्जुनच्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिलेला आहे. याशिवाय कल्पना, चैतन्य, अस्मिता, प्रिया, साक्षी, रविराज, प्रतिमा, नागराज, पूर्णा आजी या सगळ्या व्यक्तिरेखांना घराघरांत पसंती मिळत आहे. मालिकेत येणारी रंजक वळणं, मालिकेचं कथानक आणि दमदार कलाकार यामुळे या ‘ठरलं तर मग’ टीआरपीमध्ये सतत आघाडीवर असल्याचं बोललं जातं.

हेही वाचा : “दिल रख ले…”, कथित बॉयफ्रेंडबरोबर श्रद्धा कपूरने शेअर केला पहिला फोटो, जाहीरपणे दिली प्रेमाची कबुली?

आता मालिकेने एक नवीन टप्पा गाठला आहे तो म्हणजे या मालिकेचे तब्बल ५०० भाग पूर्ण झाले आहे. यासंदर्भात मालिकेचे निर्माते सोहम व आदेश बांदेकर याशिवाय ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने पोस्ट शेअर करत सर्व कलाकारांचं कौतुक केलं आहे. “आज सादर होत आहे ‘ठरलं तर मग’ मालिकेचा ५०० वा भाग… आपण या पाचशे भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार! त्याचबरोबर या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार..!! आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना..!” अशी पोस्ट वाहिनीकडून शेअर करण्यात आली आहे.

हेही वाचा : २१ वर्षांनी पुन्हा ‘इश्क विश्क’! शाहिदच्या गाण्यावर प्रसाद जवादे अन् अमृता देशमुखचा जबरदस्त डान्स, सर्वत्र होतंय कौतुक

मालिकेचा निर्माता सोहमने ‘स्टार प्रवाह’ची ही पोस्ट रिशेअर करत याच्या कॅप्शनमध्ये “मेहनत का फल” असं लिहिलं आहे. याशिवाय आदेश बांदेकरांनी सुद्धा पोस्ट शेअर करत या सगळ्या कलाकारांचं भरभरून कौतुक केलं आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम सुमीत पुसावळे, नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर, ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अपूर्वा नेमळेकर यांनी देखील मालिकेतल्या कलाकारांना पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सोहम बांदेकरची पोस्ट

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेचा ५०० वा भाग आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या मालिकेत वटपौर्णिमेच्या पूजेचा सीक्वेन्स चालू आहे. अर्जुन-सायली वडाची एकत्र पूजा करणार असल्याचं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये दाखवण्यात येत आहे.