TRP : सध्याच्या ओटीटीच्या युगात आजही छोट्या पडद्याची लोकप्रियता कायम आहे. येत्या काळात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी टिव्हीवर अनेक नवनवीन मालिका सुरू होणार आहेत. छोट्या पडद्यावरच्या मालिकांची लोकप्रियता ही टीआरपीवरून ठरवली जाते. त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर राहण्यासाठी नवीन मालिका सुरू करणं, कथानकात वेगवेगळे ट्विस्ट आणणं, मालिकेत लीप येणं असे विविध प्रयोग वाहिन्यांकडून केले जातात. गेल्या काही वर्षांपासून टीआरपीची शर्यतीत ‘स्टार प्रवाह’ वाहिनी आघाडीवर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘स्टार प्रवाह’ वाहिनीची ‘ठरलं तर मग’ मालिका गेली दोन वर्षे छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेने सुरू झाल्यापासून टीआरपीच्या शर्यतीत आपलं पहिलं स्थान कायम राखलं होतं. पण, अनेक महिन्यांनी टीआरपीच्या शर्यतीत मोठा उलटफेर झाल्याचं पाहायला मिळत आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार ‘ठरलं तर मग’ मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत आपलं पहिलं स्थान गमावलं आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या जागी पहिल्या स्थानी अद्वैत-कलाच्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेने झेप घेतली आहे. याबद्दल या मालिकेत भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींनी पोस्ट शेअर करत देखील माहिती दिली आहे.

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम दिपाली पानसरे पोस्ट शेअर करत लिहिते, “स्टार प्रवाह’मध्ये नंबर १ स्थान मिळवल्याबद्दल आमच्या संपूर्ण ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ टीमचं हार्दिक अभिनंदन! हे यश आमचे कठोर परिश्रम, समर्पण आणि टीमवर्कचं प्रतीक आहे. भविष्यात अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. आमच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा! धन्यवाद.” याशिवाय कलाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या किशोरी अंबिये यांनी देखील मालिकेने पहिलं स्थान गाठल्यावर इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

गेल्या आठवड्याच्या ( १८ जानेवारी ते २४ जानेवारी ) टीआरपीनुसार ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका पहिल्या स्थानी आहे. तर, सायली-अर्जुनची ‘ठरलं तर मग’ मालिका दुसऱ्या स्थानी आहे. तसेच ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिका टीआरपीच्या शर्यतीत अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.

दरम्यान, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर रोज रात्री ९.३० वाजता प्रसारित केली जाते. यामध्ये अक्षर कोठारी आणि ईशा केसकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.