Tharla Tar Mag TRP Rise Jui Gadkari Shares Post : ‘ठरलं तर मग’ मालिकेत अर्जुन-सायलीचं पुन्हा एकदा लग्न झालं असून, दोघंही सुभेदारांच्या घरात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अर्जुन-प्रियाच्या लग्नात सायली अचानक एन्ट्री घेते आणि आपल्याच नवऱ्याशी पुन्हा एकदा लग्न करते. मात्र, या लग्नापासून सुभेदार आनंदी नसतात. ते सायलीला घरातून हाकलून लावतात, तिचा गृहप्रवेश करत नाहीत. पण, अर्जुन तिला घरात घेऊन येतो. आपल्या बायकोला पुन्हा एकदा मानाचं स्थान मिळवून द्यायचं असा निश्चय अर्जुनने केलेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘ठरलं तर मग’ मालिकेत नवनवीन ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळालं. यामुळे प्रेक्षकांच्या मनात सुद्धा आता पुढे काय होणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. याशिवाय आता ही मालिका अर्धा तास प्रसारित न करता रोज ८:१५ ते ९:०० अशी पाऊणतास प्रक्षेपित केली जाते. या सगळ्याचा सकारात्मक परिणाम मालिकेच्या टीआरपीवर झाला. ‘ठरलं तर मग’ मालिकेला पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेकिंग टीआरपी मिळाला आहे.

‘ठरलं तर मग’ मालिका गेल्या काही आठवड्यांमध्ये टीआरपीच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी गेली होती. पण, मालिकेच्या टीमने भरपूर मेहनत घेऊन पुन्हा एकदा त्यांचं अव्वलस्थान पटकावलं आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेला गेल्या आठवड्यात ७ टीआरपी रेटिंग मिळालं आहे. सध्याच्या काळात टेलिव्हिजन मालिकेला ७ रेटिंग मिळणं ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे सर्व स्तरांतून ‘ठरलं तर मग’वर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. अशातच सायलीची भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीने सुद्धा या रेटिंगबद्दल पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानत जुईने खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये जुईच्या हातात चॉकलेट असल्याचं पाहायला मिळत आहे. “‘ठरलं तर मग’ला ७ टीआरपी रेटिंग मिळालं आहे…प्रेक्षकांनो तुमचे खूप खूप आभार, प्रेक्षकांचं प्रेम हीच खरी ट्रॉफी!” अशी पोस्ट शेअर करत जुईने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Tharla Tar Mag TRP Rise Jui Gadkari Shares Post
Jui Gadkari Shares Post

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिका गेल्या दोन वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीत अधिराज्य गाजवताना दिसते. यामध्ये जुईसह अमित भानुशाली, प्रियांका तेंडोलकर, प्राजक्ता दिघे, ज्योती चांदेकर, शिल्पा नवलकर, सागर तळाशीकर या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Story img Loader