Tharla Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सायली-अर्जुनचं प्रेम बहरत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. मात्र, या सगळ्यात मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे. हा ट्विस्ट म्हणजे पूर्ण आजी आपल्या नातवाकडून वचन घेणार आहे. सायली घर सोडून निघून गेल्यापासून तिच्या विरोधात प्रिया नेहमीच सुभेदारांचे कान भरत असते. शेवटी पूर्णा आजी आता लवकरात लवकर अर्जुन आणि प्रियाचं लग्न लावून देऊयात असा निर्णय घेते.
अर्जुन प्रियाशी लग्न करण्यास अजिबातच तयार नसतो. त्यामुळे तो कुटुंबीयांसमोर याबाबत स्पष्ट नकार देतो. अर्जुनने दिलेला नकार पूर्णा आजीला सहन होत नाही…तिची प्रकृती खालावतेय हे पाहून अर्जुनसह सुभेदार कुटुंबीय तिला रुग्णालयात दाखल करतात. पूर्णा आजी यादरम्यान अर्जुनकडून तन्वीशी लग्न कर असं वचन घेते. खरंतर खरी तन्वी ही सायली असते पण, प्रियाच्या खोटेपणामुळे सगळे तिलाच खरी तन्वी समजत असतात. शेवटी पूर्णा आजीच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून अर्जुनला प्रियाशी लग्न करण्यास होकार द्यावा लागतो. तो प्रचंड हतबल होतो. या सगळ्या गोष्टी सायली दूरवर उभी राहून पाहत असते.
‘ठरलं तर मग’ मालिकेत आता सायली लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे. काही झालं तरी प्रियाला सुभेदारांच्या घरची सून होऊ द्यायचं नाही. मीच माझ्या नवऱ्याशी पुन्हा एकदा लग्न करेन असा निर्णय सायली घेते. आता सायलीने असा निर्णय घेतल्याने प्रिया आणि सायली या दोघींमध्ये अर्जुनचं लग्न पुन्हा कोणाशी होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
मालिकेत सुरू होणाऱ्या लगीनघाईच्या पार्श्वभूमीवर आता मेहंदी सोहळा पार पडत आहे. याबद्दल सायली सांगते, “तुम्ही सगळे बघतच आहात की, अर्जुन सर पूर्णा आजीला दिलेल्या वचनामध्ये बांधले गेले आहेत. पण, मी कोणत्याही वचनामध्ये बांधली गेलेली नाहीये. त्यामुळे दोन्ही घरांमध्ये मेहंदीचे कार्यक्रम सुरू आहेत. छान मेहंदी काढली जातेय दोन्ही मुलींच्या हातावर… माझ्या हातावर मेहंदी आहे, तिथे प्रियाच्या हातावर मेहंदी काढत आहेत. पण, आता तुम्हाला बघावं लागणार आहे नक्की कोणाची मेहंदी रंगतेय…”
दरम्यान, ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर २७ जानेवारीपासून म्हणजेच आजपासून सायंकाळी ७.३० ते १० या वेळेत महासोमवार सुरू होत आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘ठरलं तर मग’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकांमध्ये यादरम्यान विशेष भाग दाखवले जाणार आहेत.