छोट्या पडद्यावरील ‘द कपिल शर्मा’ हा लोकप्रिय शो आहे. या शोमधील कलाकार त्यांच्या खुमासदार विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवतात. याच शोमधून स्टॅण्ड अप कॉमेडियन सिद्धार्थ सागरला लोकप्रियता मिळाली. परंतु, बराच काळ तो कलाविश्वापासून दूर होता. नुकतंच त्याने एका मुलाखतीदरम्यान याबद्दल भाष्य केलं आहे.
कॉमेडियन सिद्धार्थला आयुष्यात बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागला आहे. त्याने हिंदुस्तान टाइम्सला मुलाखत दिली आहे. तो म्हणाला, “केवळ कलाकारच नाही तर इतर क्षेत्रातील व्यक्ती, विद्यार्थीही नैराश्यातून जात आहेत. याचा सामना करण्यासाठी त्यांना औषधांचा आधार घ्यावा लागत आहे”. सिद्धार्थने मुलाखतीत त्याला आलेल्या नैराश्याबद्दलही भाष्य केलं. “मी बायपोलर डिसऑर्डरचा सामना करत होतो. मद्यपानाच्या आहारी गेल्यामुळे माझं कशातच लक्ष लागत नव्हतं. मी नेहमी उदास असायचो. तेव्हा मी दिवसाला औषधाच्या १८ गोळ्या खायचो. मला पूर्णपणे बरं होण्यासाठी चार वर्षाचा कालावधी लागला”, असं तो म्हणाला.
हेही वाचा >> बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायकासह अमृता फडणवीसांनी गायलं रोमँटिक गाणं, व्हिडीओ पाहिलात का?
पुढे तो म्हणाला, “बायपोलर डिसऑर्डरमुळे दिवसाला १८ गोळ्या मला खायला लागायच्या. त्यामुळे आता कोणतेही औषध खाण्याची इच्छा होत नाही. आता मी एक स्वस्थ आणि निरोगी आयुष्य जगत आहे”. सिद्धार्थने याबरोबरच कलाकारांना मिळणारी प्रसिद्धी यावरही भाष्य केलं. तो म्हणाला, “आयुष्यात पैसे आणि यश तुम्ही कधीही मिळवू शकता. परंतु, आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते”.
हेही वाचा >> “तैमूरला सांभाळणाऱ्या नॅनीला किती पगार मिळतो?”, नीतू कपूर म्हणतात “एक कोटी…”
सिद्धार्थने अनेक कॉमेडी शोमध्ये सहभागी होऊन प्रेक्षकांना हसवलं आहे. केस तो बनता है, कॉमेडी क्लासेस, कॉमेडी नाईट्स या शोमधून तो घराघरात पोहोचला. त्याने चित्रपटातही काम केलं आहे. सध्या द कपिल शर्मा शोमधून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.