‘द कपिल शर्मा शो’ मागच्या बऱ्याच वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. मागच्या काही दिवसांत या शोला काही कलाकारांनी रामराम ठोकला आहे. तर काहींनी नव्याने आपली जागा या शोमध्ये तयार केली आहे. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये या शोचा नवा सीझन आल्यानंतर कृष्णा अभिषेक या शोमधून बाहेर पडला. दरम्यान त्याने या सीझनचे प्रोमो मात्र शूट केले होते. पण शो सुरू झाल्यानंतर त्याने मानधनाच्या मुद्द्यावरून शो सोडल्याची माहिती समोर आली. मेकर्स आणि कृष्णा यांच्या मानधनाच्या मुद्द्यावरून एकमत न झाल्याने त्याने हा शो सोडला.
कृष्णा अभिषेकने हा शो सोडल्यानंतर काही रिपोर्ट्समध्ये कृष्णा आणि कपिल यांच्यात वाद झाल्याचं म्हटलं गेलं होतं. मात्र कृष्णाने हा दावा फेटाळला. त्यानंतर कपिल शर्माचा मित्र चंदन प्रभाकरनेही हा अर्ध्यावरूनच हा शो सोडला. नवा चित्रपट साइन केल्यामुळे शोमध्ये काम करता येणार नसल्याचं कारण त्याने दिलं होतं. अशात आता आणखी एक कलाकाराने या शोला रामराम ठोकला आहे. मौसी, उस्ताद घरचोरदास, फनवीर सिंह आणि सागर पगलेतु अशा पात्र साकारून प्रेक्षकांची मनं जिंकून घेणाऱ्या कॉमेडियन सिद्धार्थ सागरने आता कपिल शर्मा शो सोडल्याचं बोललं जात आहे. ‘इ-टाइम्स’ने सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.
आणखी वाचा- “हीच अभिनेत्री माझी जागा घेण्यास पात्र” ‘द कपिल शर्मा शो’दरम्यान अर्चना पूरण सिंग यांचा खुलासा
सिद्धार्थ सागरने हा शो सोडण्यामागे निर्मात्यांबरोबर मानधनाच्या मुद्द्यावरून झालेला वाद असल्याचं सांगितलं जात आहे. सिद्धार्थला त्याचं मानधन वाढवून हवं होतं आणि निर्मात्यांनी मात्र असं करण्यास नकार दिला. त्यामुळे सिद्धार्थने हा शो सोडण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. ‘द कपिल शर्मा शो’च्या शूटिंगसाठी तो मुंबईला आला होता पण आता शो सोडल्यानंतर पुन्हा दिल्लीला परतल्याची माहिती समोर आली आहे.
आणखी वाचा- ‘कपिल शर्मा शो’मध्ये पुन्हा दिसणार कृष्णा अभिषेक? कपिलबरोबरच्या वादावर म्हणाला, “तो नेहमीच…”
रिपोर्ट्सनुसार जेव्हा याबाबत सिद्धार्थ सागरशी बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा त्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. “सध्या मी यावर काहीच बोलू शकत नाही. माझं निर्मात्यांशी बोलणं सुरू आहे.” असं यावेळी त्याने सांगितलं. दरम्यान सिद्धार्थ सागरच्या आधी कृष्णा अभिषेक, भारती सिंह, चंदन प्रभाकर, सुनील ग्रोवर, अली असगर, उपासना सिंह यांनीही ‘द कपिल शर्मा शो’ला रामराम ठोकला आहे.