आपली विविध स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातून लोक मुंबईसारख्या मोठ्या शहरात येतात. शहरात आल्यावर भाड्याने घर घेऊन राहतात, लोकलचा प्रवास, गर्दीत प्रवास करताना लागणारे धक्के इथून प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील खरा संघर्ष सुरु होतो. या सगळ्यावर मात करत आपलं स्वप्न पूर्ण करायचं हे एकच ध्येय सामान्य माणसाचं असतं. सामान्य लोकांप्रमाणे मराठी कलाविश्वातील असंख्य कलाकार देखील आपली मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आजच्या घडीला लोकप्रिय झाले आहेत. हेच चित्र छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांच्या बाबतीत देखील पाहायला मिळतं. गेल्या काही दिवसांत अनेक कलाकारांनी नवीन घरं, नव्या गाड्या घेत आपली स्वप्नपूर्ती केली. अशातच आता आणखी दोन अभिनेत्री नव्या घरात शिफ्ट झाल्याचं पाहायला मिळालं. या अभिनेत्री एकमेकींच्या रुममेट्स आहेत. या दोघी नेमक्या कोण आहेत जाणून घेऊयात…
छोट्या पडद्यावर काम करणारे बरेच कलाकार एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. अनेक कलाकार मुंबईत नवीन असल्याने एकमेकांचे रुममेट्स आहेत. अशाच दोन रुममेट्सबद्दल आपण जाणून घेणार आहेत. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये या दोन अभिनेत्री काम करतात. दोघींनीही ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर खलनायिकांच्या भूमिका साकारल्या आहेत.
‘मुरांबा’ मालिकेतून अभिनेत्री निशानी बोरुले घराघरांत लोकप्रिय झाली. यामध्ये तिने रेवा हे नकारात्मक पात्र साकारलं आहे. तर, अभिनेत्री विदिशा म्हसकर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत झळकली होती. या मालिकेने गेल्यावर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला असं जरी असलं तरीही, विदिशाने साकारलेलं खलनायिकेचं पात्र आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. याशिवाय अभिनेत्रीने ‘भाग्य दिले तू मला’, ‘हे मन बावरे’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये खलनायिकेच्या भूमिका साकारल्या होत्या.
विदिशा आणि निशानी यांनी त्यांच्या घरातील एका खिडकीजवळ बसून सुंदर असा फोटो काढला आहे. “अलीकडे सगळ्या मुलींना आपल्या जोडीदारासह एकत्र राहायचं असतं… अशा या जगात आम्ही दोघी एकमेकींना साथ देत आहोत. नवीन घर, नवीन सुरुवात आणि नवे आम्ही, सगळंच नवं… फक्त नव्या घराची पार्टी नाहीये हा” असं कॅप्शन विदिशाने या फोटोला दिलं आहे. नुकत्याच या दोन मैत्रिणी नव्या घरात शिफ्ट झाल्या आहेत.
हेही वाचा : अभिनेत्री रेशम टिपणीसची मुलं काय काम करतात? अभिनेत्री म्हणाली, “मुलगा ग्राफिक्स डिझायनर, तर मुलगी…”
दरम्यान, कलाविश्वातील या दोन अभिनेत्रींची सुंदर अशी मैत्री पाहून नेटकऱ्यांसह त्यांच्या जवळच्या कलाकार मित्रमंडळींनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. रेश्मा शिंदे, अपूर्व रांजणकर, गौरी कुलकर्णी, अक्षया हिंदळकर यांनी विदिशा आणि निशानीला खास कमेंट करत शिफ्ट झालेल्या नव्या घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.