एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेली ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेने गेल्या वर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला. १८ नोव्हेंबर २०२३ला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. २०२१ रोजी ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेते शरद पोंक्षे, उदय टिकेकर, चेतन वडनेरे, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, सुप्रिया पाठारे, लीना भागवत, सारिका निलाटकर-नवाथे, नम्रता प्रधान अशा अनेक तगड्या कलाकार मंडळींनी मालिकेतील आपापली पात्र उत्तमरित्या साकारली. त्यामुळेच शशांक, अप्पू, माई, दादा, विठू, सुवा, कूकी, पन्ना, बाबी आत्या, अमेय, मानसी अशी अनेक पात्र प्रेक्षकांना आपल्या घरातली वाटली. आता ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतील एक अभिनेता वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत झळकलेला अभिनेता स्वप्नील काळे ‘कुन्या राजाची गं तू रानी’ मालिकेत पाहायला मिळणार आहे. ‘ठिपक्यांची रांगोळी’मध्ये स्वप्नीलने अमेयची भूमिका साकारली होती. आता तो ‘कुन्या राजाची गं तू रानी’ मालिकेत नव्या भूमिकेत झळणार आहे. यासंदर्भात स्वप्नीलने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा – हातात कुबड्या, कमरेला पट्टा: हृतिक रोशनला नेमकं झालंय तरी काय? जाणून घ्या…
अभिनेत्याने नव्या भूमिकेतील लूकचे फोटो शेअर करत लिहिलं आहे, “पुन्हा अॅक्शनमध्ये… पाहा ‘स्टार प्रवाह’वर संध्याकाळी ७ वाजता ‘कुन्या राजाची गं तू रानी’ मालिकेत रणजित देशमुखच्या भूमिकेत…”
स्वप्नीलच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. चेतन वडनेरे, विद्या सावळे, गिरीजा प्रभू, तन्वी बर्वे, सारिका नवाथे अशा अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.