‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर २० नोव्हेंबरपासून अभिनेत्री ईशा केसकर व अभिनेता अक्षर कोठारी यांची प्रमुख भूमिका असलेली नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ असं नव्या मालिकेचं नाव असून रात्री ९.३० वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे. त्यामुळे आता ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. काल या मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस पार पडला. त्यामुळे सध्या मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या दोन वर्षांपासून एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेली ‘ठिपक्यांची रांगोळी’ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. शशांक, अप्पू, माई, दादा, विठू, सुवा, कूकी, पन्ना, बाबी आत्या ही पात्र प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. पण आता मालिका लवकरच ऑफ एअर होणार आहे. यानिमित्ताने मालिकेतील कलाकार मंडळी सेटवरचे शेवटचे फोटो शेअर करत आतापर्यंतच्या प्रवासाविषयी लिहीत आहे.

हेही वाचा – उर्मिला निंबाळकरच्या लेकाबरोबर नेमकी काय घडली होती विचित्र घटना? जाणून घ्या…

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील नेत्रा म्हणजेच अभिनेत्री प्रांजल आंबवणे हिने नुकतीच पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने लिहीलं आहे, “सदैव आठवणीत राहील अशी ‘ठिपक्यांची रांगोळी’…गेले २ वर्ष रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या आमच्या रांगोळीच्या प्रवासाचा कालचा शेवटचा टप्पा …शेवटचं शूट…ठिपक्यांच्या रांगोळीने नेत्राला (प्रांजलला) काय दिलं? तर रसिकांचं खूप सारं प्रेम, एक नवी ओळख दिली. सर्व प्रथम आभार ‘स्टार प्रवाह’ आणि नरेंद्र मुधोळकर सर, आमच्या निर्मात्या रुपाली गुहा , प्रोजेक्ट हेड सूचित शब्बीर, दिग्दर्शक गिरीश वसईकर/सचिन सर , परेश सर यांचे…”

“ग्रे शेड रंगवायची, ती ही लोकप्रिय अशा ‘शप्पू’ (शशांक-अप्पू)च्या जोडी समोर आणि कसलेल्या अशा सर्व नामांकित अभिनेत्यांच्या ‘कानिटकर कुटुंबासमोर’ या गोष्टीचे काहीसे दडपण घेऊनच मी इथे आले. पण अभिनयातले बारकावे, भूमिकेचा अभ्यास कसा करावा? यासाठी लीना ताई, सुप्रिया ताई, सारिका ताई, शरद दादा, मंगेश सर, अतुल दादा सर्वांचीच खूप मदत झाली. ज्ञानदा व चेतनने ‘शप्पू’ला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. कुक्की-पन्ना आणि बाकीची यंग ब्रिगेड तर फॉर्ममध्ये होतीच. या अशा रंगबिरंगी रांगोळीमध्ये मी ही आपले काही रंग भरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मी आशा करते की, तो रंग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. माझ्यासाठी नाही तर सगळ्यांसाठी हा प्रवास भावनिक होता. पुन्हा नक्कीच भेटू. पण… ‘ठिपक्यांची रांगोळी’ मात्र सदैव स्मरणात राहील माझ्या आणि तुमच्याही …” अशी भावुक पोस्ट प्रांजलने शेअर केली आहे.

हेही वाचा – “माझं छोटं बाळ आज २१ वर्षांचं झालं”, मलायका अरोराची लेकासाठी खास पोस्ट, म्हणाली, “प्रामाणिक…”

हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील लहानग्या कार्तिकीने केल्या चकल्या, व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

दरम्यान, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो आल्यापासून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ऑफ एअर होणार अशी चर्चा सुरू झाली होती. पण ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका बंद होणार नसून रात्री १० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं निश्चित झालं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thipkyanchi rangoli fame actress pranjal ambavane share emotional post about serial journey pps
Show comments