‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ने नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला. २०२१ साली सुरू झालेल्या या मालिकेने दोन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अल्पावधीतच ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. मालिकेतील शशांक, अप्पू, माई, दादा, विठू, सुवा, कूकी, पन्ना, बाबी आत्या अशा अनेक पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं. एवढंच नाही तर प्रेक्षकांना ही पात्र आपल्या घरातली वाटू लागली. त्यामुळे मालिका बंद होणार हे कळताच प्रेक्षकांनी ‘मालिका सुरू ठेवा’, ‘मालिकेचा लवकरच दुसरा भाग आणा’, अशा मागण्या केल्या. प्रेक्षकांच्या याच मागण्यांना दाद देत आता ‘स्टार प्रवाह’ने ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही आनंदाची बातमी शशांक म्हणजेच अभिनेता चेतन वडनेरेने दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता चेतन वडनेरेने काही तासांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. “‘ठिपक्यांची रांगोळी’ आता पुन्हा सुरू होणार…”, असं लिहित त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत चेतन म्हणतोय, “‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका पुन्हा सुरू होतेय….पण…पण…पण…यंदा हे मालिकेचं पुनःप्रक्षेपण असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ही मालिका पुन्हा बघायची असेल. तर स्टार प्रवाहाच्या युट्यूब चॅनेलवर जायचं आणि तिथे दर सोमवारी सकाळी ९ वाजता मालिकेचं पुनःप्रक्षेपण होईल. सोमवार ते रविवार मालिकेचं पुनःप्रक्षेपण होणार आहे. त्यामुळे ज्यांची ही मालिका बघायची राहून गेलीये किंवा ज्या लोकांना जुने एपिसोड पुन्हा एकदा बघायचे आहेत. त्यांनी आवर्जुन ही मालिका बघा.”

हेही वाचा – “कपडे न घातलेलं दाखवायचं आणि…”, मुलासाठी आलेल्या जाहिराती नाकारण्याबद्दल स्पष्टच बोलला शशांक केतकर

चेतनने दिलेली आनंदाची बातमी ऐकून प्रेक्षकांनी त्याच्या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाली, “थँक्यू सो मच शशांक दादा खूप गोड बातमी दिली.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “मालिकेचा दुसरा भाग पाहिजे.” तसंच तिसरा नेटकरी म्हणाला, ” ‘ठिपक्यांची रांगोळी’चे एपिसोड आम्ही बघतोच..पण आम्हाला ही मालिका एवढ्या लवकर का संपवली ते अजून समजलंच नाही. आम्हाला तिच कलाकार मंडळी असलेली ‘ठिपक्यांची रांगोळी’चा दुसरा भाग हवा आहे. प्लीज विचार करा.”

हेही वाचा – ‘थ्री इडियट्स’मधील ‘चतुर’चं मराठीत पदार्पण; चित्रपटाच्या नावाने वेधलं लक्ष, साकारणार हटके भूमिका

दरम्यान, ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेच्या वेळेत सध्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका सुरू आहे. तसेच ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही नवी मालिका ९.३० वाजता प्रसारित होत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thipkyanchi rangoli serial again start on star pravah youtube actor chetan vadnere announced pps