‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेली मालिका ‘आई कुठे काय करते’ने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. गेली पाच वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन केलं. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधतीप्रमाणे इतर भूमिका देखील घराघरात पोहोचल्या. अनिरुद्ध, संजना, यश, ईशा, अभिषेक, अनिश, आप्पा, कांचन देशमुख, शंतून, विशाखा, आशिष या व्यक्तिरेखांनी सुद्धा प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. तसंच मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांचा चांगलाच खिळवून ठेवलं. त्यामुळे मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती.
३० नोव्हेंबरला ‘आई कुठे काय करते’ मालिकेचा शेवट झाला. आता या मालिकेची जागा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ ने घेतली आहे. २ डिसेंबरपासून दुपारी २.३० वाजता ही नवी मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. याच मालिकेसाठी महाराष्ट्र भूषण आणि मराठी रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असलेले अशोक सराफ यांनी निवेदिता सराफ यांना खास सल्ला दिला. ते काय म्हणाले? जाणून घ्या…
काही दिवसांपूर्वी निवेदिता सराफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ मालिकेचा प्रोमो पाहून अशोक सराफ आणि मुलगा अनिकेत सराफ यांची प्रतिक्रिया काय होती? याबद्दल विचारलं. तेव्हा निवेदिता सराफ म्हणाल्या, “अशोक म्हणाले प्रोमो छान झालाय, एपिसोड बघूया. प्रोमोने तुमची जबाबदारी वाढवली आहे. प्रोमो चांगला केलाय तर एपिसोड चांगला केलाच पाहिजे, अशी त्यांची प्रतिक्रिया होती. अनिकेतला हे प्रोमो खूप आवडले.”
दरम्यान, ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेली मालिका ‘आई कुठे काय करते’ची जागा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ मालिकेने घेतली आहे. या मालिकेत निवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांच्या व्यतिरिक्त हरीश दुधाडे, प्रतिक्षा जाधव, अदिश वैद्य, पल्लवी कदम असे तगडे कलाकार मंडळी पाहायला मिळत आहेत.