सध्या नव्या मालिकेचं हंगाम सुरू आहे. येत्या काळात अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. १२ फेब्रुवारीपासून ‘पारु’ व ‘शिवा’ या दोन नव्या मालिका सुरू झाल्या आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘पारु’ संध्याकाळी ७.३० वाजता, तर ‘शिवा’ रात्री ९ वाजता प्रसारित होतं आहे. अल्पावधीत या दोन नव्या मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण टीआरपीच्या यादीत कोणती मालिका वरचढ आहे? जाणून घ्या…
‘पारु’ या नव्या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे व अभिनेता प्रसाद जवादे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. तसेच मुग्धा कर्णिक, पूर्वा शिंदे, परी तेलंग, अनुज साळुंखे, प्राजक्ता वाडये, विजय पटवर्धन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. याशिवाय ‘शिवा’ मालिकेत अभिनेत्री पूर्वा फडके व अभिनेता शाल्व किंजवडेकर मुख्य भूमिकेत असून सविता मालपेकर, मीरा वेलणकर यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहेत. टीआरपीच्या यादीत या दोन्ही मालिका सुरुवातीपासून टॉप-२०मध्ये कायम आहेत. या आठवड्याच्या टीआरपी यादीत ‘पारु’ ही ‘शिवा’ मालिकेवर वरचढ झाली आहे.
गेल्या आठवड्याच्या टीआरपी यादीत ‘शिवा’ ही मालिका ‘पारु’वर वरचढ झाली होती. ‘पारु’चा मालिकेचा टीआरपी घसरला होता. पण या आठवड्यात ‘पारु’ मालिका ‘शिवा’पेक्षा पुढे आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मालिकांचा टीआरपी ‘स्टार प्रवाह’च्या ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेपेक्षा जास्त आहे.
‘मराठी टीआरपी तडका’ या इस्टाग्राम पेजवर या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ‘पारु’ मालिका १७ नंबरवर असून २.८ रेटिंग मिळालं आहे. तर ‘शिवा’ मालिका १८ नंबरवर आहे आणि २.७ रेटिंग मिळालं आहे. तसेच गेल्या वर्षभरापासून ‘ठरलं तर मग’ ही मालिका अव्वल स्थानावर आहे. या आठवड्यात जुई गडकरी व अमित भानुशालीच्या या लोकप्रिय मालिकेला ६.७ रेटिंग मिळालं आहे.
टॉप-१० मालिका
१) ठरलं तर मग – ६.७ रेटिंग
२) प्रेमाची गोष्टी – ६.५ रेटिंग
३) लक्ष्मीच्या पाऊलांनी – ६.४ रेटिंग
४) तुझेच मी गीत गात आहे – ६.३ रेटिंग
५) सुख म्हणजे नक्की काय असतं – ५.९ रेटिंग
६) आई कुठे काय करते – ५.३ रेटिंग
७) सुख म्हणजे नक्की काय असतं (महाएपिसोड) – ५.० रेटिंग
८) आई कुठे काय करते (महाएपिसोड) – ४.६ रेटिंग
९) कुन्या राजाची गं तू रानी – ४.६ रेटिंग
१०) मन धागा धागा जोडते नवा – ४.६ रेटिंग