स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका वरती यावी यासाठी सर्वच कलाकार धडपड करत आहेत. मालिकेमध्ये मानसी आणि तेजस या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना फार आवडते. मानसी कायम प्रभूंच्या कुटुंबासाठी खंबीर उभी राहिलेली दिसते. मात्र, गायत्री सतत या दोघांच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न करते.
मालिकेत सध्या घर चालवण्याची जबाबदारी मानसीने स्वीकारलेली आहे. त्यासाठी ती लाडू बनवून ते विविध ठिकाणी विकत आहे. मात्र, तिचे लाडू विकले जाऊ नयेत म्हणून गायत्री छाया आणि विनोद या दोघांच्या मदतीने लाडूमध्ये औषध मिसळते, त्यामुळे ज्या व्यक्ती लाडू खातात त्यांची प्रकृती बिघडते. हा सर्व प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तेजस लक्ष ठेवून असतो, त्यामुळे तो छाया आणि विनोद या दोघांना लाडूमध्ये औषध टाकताना पकडतो.
हा सर्व प्रकार गायत्रीनेच घडवून आणला आहे आणि तिच्या सांगण्यावरून या दोघांनी ही कामे केली आहेत हे मानसी आणि घरातील अन्य व्यक्तींच्या लक्षात येतं. आता यावरून मानसी गायत्रीला चांगलीच ताकीद देणार आहे. नुकताच मालिकेच्या पुढील भागाचा एक प्रोमो समोर आला आहे. यामध्ये मानसी गायत्रीला ताकीद देत आहे.
हेही वाचा
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मानसी थेट गायत्रीच्या खोलीत प्रवेश करते. त्यानंतर ती खोलीचं दार बंद करते. तसेच गायत्रीला “खरंच ते लाडू खराब व्हावेत म्हणून तुम्ही काही नाही केलं?”, असा प्रश्न विचारते. त्यावर गायत्री मानसीला “तू माझ्यावर आरोप करते”, असं म्हणते. पुढे “गायत्री वहिनी गेम खेळायचा असेल तर पातळी सोडून खेळू नका, खरा गेम खेळा”, अशा शब्दांत मानसी गायत्रीला ताकीद देत आहे.
हा व्हिडीओ स्टार प्रवाह वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेचा हा भाग महासोमवार म्हणजेच सोमवारी १७ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता पाहता येणार आहे. आता गायत्रीने केलेली चूक तिने मान्य करावी यासाठी मानसी पुढे काय करणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.
गायत्रीने याआधी तेजसला लाच घेतल्याच्या खोट्या प्रकरणात अडकवलं होतं. सर्व पुरावे त्याच्याविरोधात असताना मोठ्या युक्तीने त्याने केस जिंकली. या काळात प्रभूंच्या घरावार जमावाकडून हल्ला करण्यात आला. त्यावेळीही मानसी कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीर उभी राहिली. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेत अभिनेत्री शिवानी सुर्वे मानसी हे मुख्य पात्र साकारत आहे. तर समीर परांजपे तेजस हे पात्र साकारत आहे.