अभिनेता समीर परांजपे(Sameer Paranjape) हा त्याच्या मालिकेतील विविध भूमिकांसाठी ओळखला जातो. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून त्याची ओळख निर्माण झाली. याशिवाय त्याने ‘क्लास ऑफ ८३’, ‘फिरस्ता’ हे चित्रपट आणि ‘गोठ’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या तो स्टार प्रवाहवरील ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेत त्याने तेजस ही भूमिका साकारली आहे. नुकताच स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा पार पडला. यामध्ये त्याला सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य हा पुरस्कार मिळाला आहे. आता त्याने एका मुलाखतीत ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेतील त्याच्या भूमिकेबद्दल वक्तव्य केले आहे.
काय म्हणाला अभिनेता?
अभिनेता समीर परांजपेने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याच्या मालिकेतील भूमिकेविषयी बोलताना अभिनेता म्हणाला, “तेजस हा हळूहळू उमगू लागला आहे. प्रत्येक कलाकाराला त्या पात्राला थोडा वेळ द्यावा लागतो, तर तसं काहीसं झालं आहे. मला मजा याची वाटते की, एका मालिकेचा हिरो असूनही तो वेगळा आहे. हिरो म्हटल्यानंतर तुम्हाला ते एक करावं लागतं, म्हणजे वेगात तुमचे केस उडणार किंवा तुमची एन्ट्री होणार. पण, या हिरोचे असे कुठलेच गुणधर्म नाहीत. तो संपूर्णपणे आपण आपल्या सामान्य आयुष्यात जसा असतो, तसा आहे. कुठलीही गोष्ट हिरोसारखी नाही. मालिकेत त्या पात्राची गोची जास्त झालेली दिसते, त्यामुळे या भूमिकेची मला फार कमाल वाटली की वेगळं काहीतरी करायला मिळत आहे. परिस्थितीनुसार विनोदीपणा, त्याचा मिश्किलपणा, त्याची स्टाईल आहे.”
“बऱ्याचदा थट्टेखोरपणा हा उद्धटपणा समजला जातो. आम्हालाही असं वाटलं की कुठल्याही क्षणी तो आगाऊ आहे असं वाटायला नको, त्यामुळे तो आगाऊ न वाटता लोकांना आवडायला पाहिजे हा टास्क होता. हे पात्र साकारायला मला फार मजा येतेय. आमचे दिग्दर्शक, लेखक यांचीसुद्धा कमाल आहे की एक तर असं पात्र आपण साकारूया असं सांगणं आणि चॅनेलनेही त्याला पाठिंबा देणं, त्यामुळे त्याबाबतीत मी नशीबवान आहे; कारण प्रत्येकवेळी माझ्या वाट्याला वेगवेगळ्या भूमिका आल्या आहेत.”
पुढे ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेतील त्याच्या लूकबद्दल समीर परांजपे म्हणाला, “मालिकेसाठी लूक टेस्ट झाली होती. मी बरीच वर्षे दाढी- मिशी अशा लूकमध्ये होतो. मी त्यामध्ये कम्फर्टेबल झालो होतो. माझ्या मुलीलाही तोच लूक आवडतो. मालिकेच्या लूक टेस्टवेळी असं ठरलं की, मिशी ठेऊयात आणि दाढी काढूयात. मी ते केलं. त्यानंतर जेव्हा घरी आलो तेव्हा मुलगी माझ्या जवळच येईना. ती मला म्हणाली की हे काय केलं आहेस, दाढी परत आण. मी तिला सांगितलं की, आता थोडे दिवस असाच दिसणार आहे. मग एक-दोन दिवसानंतर ती रूळली. मुळात एखादा लूक ही पात्राची गरज असते. जेव्हा तुम्ही स्वत:ला त्या पात्राच्या पोशाखात बघता, त्यावेळी तुम्हाला वाटलं पाहिजे की हा तो व्यक्ती किंवा ते पात्र आहे”, असे म्हणत समीर परांजपेने त्याच्या मालिकेतील लूक पाहिल्यावर मुलीची काय प्रतिक्रिया होती, याबद्दल खुलासा केला आहे.