‘नाच रे मोरा’ हे गाणं आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाला माहीत आहे. मात्र, अनेकदा आपण आपल्याला ज्या पद्धतीने शिकवले जाते, त्याच चालीत एखादं गाणं गुणगुणत असतो. आता मात्र एका अभिनेत्याने हे गाणे हटके स्टाईलमध्ये गात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर ‘आता होऊ दे धिंगाणा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करताना दिसतो. सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असून यामध्ये विविध गेम घेतले जातात. स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिकांमधील कलाकार यामध्ये हजेरी लावताना दिसतात. आता या कार्यक्रमाच्या मंचावरून ‘थोडं तुझं थोडं माझं’ या मालिकेतील तेजसची भूमिका साकारणारा अभिनेता समीर परांजपे(Sameer Paranjape)ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं
स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर सक्रांत संध्या असे म्हणत कलाकरांच्या आता होऊ दे धिंगाणा कार्यक्रमातील काही धमाल-मस्तीचे क्षण शेअर केले आहेत. यामध्ये ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ व ‘थोडं तुझं थोडं माझं’ या मालिकेच्या टीम कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसत आहेत. या सगळ्यात ‘थोडं तुझं थोडं माझं’ मालिकेत तेजसची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता समीर परांजपेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. समीरने ‘नाच रे मोरा नाच’ हे गाणे प्रसिद्ध बॉलीवूड गाण्यांच्या चालींवर म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याने विविध लोकप्रिय गायकांच्या आवाजातदेखील ‘नाच रे मोरा’ हे गाणे म्हटले आहे. स्टार प्रवाह वाहिनीबरोबरच अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरदेखील गाण्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना गुस्ताख़ी माफ़ अशी कॅप्शन दिली आहे.
समीर परांजपेच्या आवाजातील नाच रे मोरा गाणे ऐकल्यानंतर प्रेक्षकांनी अभिनेत्याचे भरभरून कौतुक केले आहे. “किती छान गायलास, खूपच छान, कधी विचार नव्हता केला, हे गाणं असंही एवढे छान ऐकायला मिळेल”, “बार्शीचा सोनू निगम”, “रडवलंस तू, लव्ह यू”, “मस्तच रे समीर, अगदी तिळगुळासारखा गोड आवाज”, “क्या बात”, अशा अनेक कौतुकांच्या कमेंट केल्या आहेत.
चाहत्यांबरोबरच कलाकारांनीदेखील कमेंट करत समीरचे कौतुक केले आहे. साक्षी गांधीने वाह असे म्हणत कौतुक केले. पूजा बिरारीने कमाल अशी कमेंट केली आहे, तर मयुरी देशमुखनेदेखील कमेंट करीत अभिनेत्याचे कौतुक केले आहे.
अभिनेता सध्या ‘थोडं तुझं थोडं माझं’ मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. त्याच्याबरोबर अभिनेत्री शिवानी सुर्वेदेखील मुख्य भूमिकेत आहे.