रामानंद सागर दिग्दर्शित ‘रामायण’ ही मालिका ९०च्या दशकात प्रचंड गाजली. लोक त्यांची कामे बाजूला ठेवून ही मालिका पाहायचे. या मालिकेची लोकप्रियता आजही तितकीच आहे. करोना काळात या मालिकेचे पुनर्प्रसारण केले गेले. तीन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी या मालिकेने वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता. आज या घटनेला तीन वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे.
आजच्या दिवशी तीन वर्षांपूर्वी ‘रामायण’ या मालिकेतील लक्ष्मण आणि मेघनाद यांच्या युद्धाचा एपिसोड प्रसारित झाला होता. या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका सुनील लहरी यांनी साकारली होती. तर अभिनेते विजय अरोरा यांनी मेघनादची भूमिका साकारली होती. त्यांच्यातील हा युद्धाचा एपिसोड प्रचंड मोठ्या प्रमाणात पाहिला गेला. हा एपिसोड इतक्या लोकांनी पाहिला होता की या एपिसोडने नवा विक्रम नोंदवला होता.
आणखी वाचा : “करोनाकाळात ‘रामायण’ ‘महाभारता’ने…”; पौराणिक मालिकांवर स्वप्नील जोशीचा खुलासा
सुनील लहरी यांनी एक ट्वीट करीत आज सर्व प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. लक्ष्मण आणि मेघनाद यांच्यातील युद्धाचा एक फोटो पोस्ट करीत त्यांनी लिहिले आहे, आजच्या दिवशी १६ एप्रिल २०२० रोजी ‘रामायण’ मालिकेतील लक्ष्मण-मेघनाद यांच्या युद्धाच्या एपिसोडने वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता. हा टेलिव्हिजन विश्वातील एक मैलाचा दगड ठरला. ७.७ कोटी प्रेक्षकांनी हा एपिसोड पाहिला होता. तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. हे सगळे तुम्हा सर्वांमुळेच शक्य झाले आहे.”
आता त्यांचे हे ट्वीट खूप चर्चेत आले आहे. या त्यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देत त्यांचे चाहते त्यांच्याबद्दल, या मालिकेतील सर्व कलाकारांबद्दल आणि या मालिकेबद्दल भरभरून प्रेम व्यक्त करीत आहेत. याचबरोबर “ही मालिका पुन्हा एकदा पाहायला आम्ही आनंदाने तयार आहोत,” असेही त्यांचे चाहते या ट्वीटवर कमेंट करीत त्यांना सांगत आहेत.