‘सावळ्याची जणू सावली'( Savlyachi Janu Savli) मालिकेत सध्या नवीन वळण आलेले दिसत आहे. या मालिकेत सारंग आणि सावलीचे नुकतेच लग्न झाले आहे. मात्र, हे लग्न त्यांच्या मर्जीविरुद्ध झाले असल्याचे पाहायला मिळाले. आता झी मराठी वाहिनीने या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये सावलीच्या गृहप्रवेशावेळी मोठा गोंधळ होणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
तिलोत्तमाने सावलीचा गृहप्रवेश नाकारला…
‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेचा प्रोमो झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, सावली सारंग लग्न करून घरी येतात. तिलोत्तमा सुनेचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे. ती म्हणते, “सारंग मला औक्षण करायचं आहे, मला सुनमुख बघायचं आहे, चेहरा तर दाखवा.” सारंगच्या पाठीमागून सावली पुढे येते. तिला पाहताच तिलोत्तमाला धक्का बसतो. तिच्या हातातून आरतीचे ताट खाली पडते. ती म्हणते, “माझ्या घरात फक्त आणि फक्त सौंदर्यच वास्तव्य करू शकतं. हिची लायकी आहे का माझ्या घरची सून व्हायची? माझ्या घरात आणि सारंगच्या आयुष्यात मला ही मुलगी अजिबात नकोय.” त्यानंतर सगळे निघून जातात. मेहंदळेंच्या घराबाहेर सावली एकटी उभी आहे. तिच्या हातात विठ्ठलाची मूर्ती असून ती रडत असल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “होईल का सावलीचा गृहप्रवेश…?”, अशी कॅप्शन दिली आहे.
सावळ्याची जणू सावली मालिकेचा हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले, “सारंगने बायकोची साथ द्यायला पाहिजे आता”, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले, “सावलीच्या गृहप्रवेशाने सगळं काही ठीक होणार, तिच्या पाठी विठ्ठल आहे.”
तर काही नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळत आहे. “आधीच सावळ्या, नीम गोऱ्या मुलींच्या जीवनात काय कमी प्रॉब्लेम असतात का, की तुम्ही सीरियलवाले त्यात अजून भर घालता? प्रत्येक ठिकाणी लग्नापासून नोकरीपर्यंत त्यांना नवीन आव्हाने असतात, कशाला इतकी निगेटिव्हिटी पसरवता. जरा आयुष्यात चांगलंही दाखवत जा. रडकी बोळवणं बंद करा”, “आजचा काळ कोणता आहे? तुम्ही समाजाला अजून मागे जुन्या घाणेरड्या विचाराकडे घेऊन जात आहात.”
“सीरियल सुरू होताना ते दाखवतात ना, कुठलीही रंग, धर्म, जात, भाषा यांचा अपमान ही वाहिनी करत नाही, मग हे काय आहे नेमके. ठीक आहे, एक द्वेष दाखवलाय काळ्या रंगाबद्दल. अरे पण ही सीरियल कहर करतेय. एवढी तरी लाज वाटू द्या, इथे गरिबांचा अपमान दाखवलाय, काळ्या दिसणाऱ्या मुलींचा अपमान आहे, लग्न ही गोष्टसुद्धा अतिशय खालच्या थराला जाऊन दाखवली आहे. देव कितीही पाठीशी असला तरी समाजात अशा दिसणाऱ्या मुलींनी आधी एवढं सगळं सहन करायचं का? कोणाचाही सतत मार खायचा. पावलोपावली अपमान, कुठलंही समाजिक स्वातंत्र्य नाही, दर्जा खालावलाय.”
आता मालिकेत पुढे काय होणार, सावलीचा गृहप्रवेश होऊ शकणार का, ती मेहंदळेंच्या घरात स्वत:चे अस्तित्व कसे निर्माण करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd