Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding Updates : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि ‘दृश्यम २’ फेम अभिनेता सिद्धार्थ बोडके यांचा लग्नसोहळा नुकताच पार पडला. दोघांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. तितीक्षा आणि सिद्धार्थच्या जवळच्या मैत्रिणीने त्यांच्या लग्नसोहळ्यातील पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सिद्धार्थ-तितीक्षाच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा चालू होती. अखेर ही जोडी लग्नबंधनात अडकली आहे. या जोडप्याच्या लग्नाला गौरी नलावडे, रसिका सुनील व तिचा पती, खुशबू तावडे, संग्राम साळवी, अनघा अतुल, ऐश्वर्या नारकर, सुरुची अडारकर अशा बऱ्याच कलाकारांनी उपस्थिती लावली आहे.
हेही वाचा : लग्नानंतर जोडीने देवदर्शन! प्रथमेश परब बायकोसह पोहोचला मुंबादेवीच्या मंदिरात, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष
तितीक्षाने लग्नात ऑफ व्हाइट रंगाची नऊवारी साडी नेसली होती, तर सिद्धार्थने बायकोला मॅचिंग असा सदरा परिधान केला होता. सध्या संपूर्ण कलाविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

दरम्यान, सिद्धार्थ बोडके आणि तितीक्षा तावडेने ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. अभिनेत्रीने आतापर्यंत ‘असे हे कन्यादान’, ‘तू अशी जवळी रहा’, ‘सरस्वती’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. याशिवाय सिद्धार्थ बोडके ‘दृश्यम २’ या बॉलीवूड चित्रपटात व नुकताच ‘श्रीदेवी प्रसन्न’मध्ये झळकला होता.